News Flash

“…तर लोक जोड्यानं मारतील”, स्वबळाच्या नाऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सुनावलं!

काँग्रेसनं राज्यात स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता शिवसेना वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेसला तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

uddhav thackeray on nana patole
उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याला उत्तर दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला आहे. त्यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून यावर काहीही भूमिका घेतली गेली नव्हती. मात्र, शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनाचं निमित्त साधून उद्धव ठाकरेंनी त्यावर सडेतोड भूमिका मांडत काँग्रेसला अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिलं आहे. “जे अनेक राजकीय पक्ष करोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना मला सांगायचंय की स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतंच नसतं. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल, तर वार कसा करणार?” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच, “लोक अस्वस्थ असताना स्वबळाचे नारे दिलेत, तर लोक जोड्याने मारतील”, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

जर शिवसेना प्रमुखांनी पक्ष स्थापन केला नसता तर…

“अनेक राजकीय पक्ष करोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ स्वबळाचा नारा. स्वबळ तर हवंय. ताकद तर कमवावीच लागते. पण ती कशी? माझे आजोबा आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे की स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास असायला हवा. जर आत्मविश्वास नसेल तर तू काहीही करू शकणार नाही आणि आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठिवर तुला कुठेही मरण नाही. आत्मबळ आणि स्वबळ हेच तर शिवसेनेनं दिलं. सेनेची स्थापना झाली, तेव्हा मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती. मराठी माणसाला अपमानित बनून जगावं लागत होतं. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर आज महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसाची जी अवहेलना झाली असती ती विचारता सोय नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

…तर लोक जोड्यानं मारतील!

“स्वबळ म्हणजे काय? करोना काळात देशातील, महाराष्ट्रातील नागरिक अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता लक्षात न घेता स्वबळाचा नारा दिला. आम्ही स्वबळावर आणू असं म्हटलं, तर लोक जोड्यानं हाणतील. लोक म्हणतील तुझी सत्ता तुझ्याकडे ठेव आणि माझ्या रोजीरोटीचं काय ते सांग. तुझं बळ तू वाढवणार आणि आम्हाला भिकेला लावणार? हा विचार आपण केला नाही, तर आपला देश अस्वस्थतेकडे चालला आहे हे निश्चित”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “केवळ निवडणुका आणि सत्ताप्राप्ती हा विचार सर्वच राजकीय पक्षांनी बाजूला ठेऊन करोनाच्या संकटाचा सामना कसा करायचा याचा विचार करायला हवा. ते न करता आपण विकृत राजकारण करत राहिलो, तर आपल्या देशाचं काही खरं नाही”, असं देखील उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.

..तर पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, आम्ही स्वतंत्रच लढणार – नाना पटोले

बळच नाही तर वार कसले करताय?

काँग्रेसला यावेळी उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष शब्दांमध्ये देखील सुनावलं. “स्वबळाविषयी मी का सांगतोय तर जे अनेक जण सध्या स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना सांगायचंय मला की स्वबळ म्हणजे फक्त निवडणूक लढण्यापुरतंच असायला हवं असं नाही. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होतोय आणि अन्यायाविरुद्ध वार करायचाय पण बळच नाहीये आणि वार कसले करताय? आधी तलवार उचलण्याची ताकद कमवावी आणि मग वार करावा. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात निवडणुका जातात. हारजीत होत असते. जिंकलं तर आनंद आहे. पण हारल्यानंतरसुद्धा पराभूत मानसिकता घात करते”, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपासून स्वबळाचा नारा द्यायला सुरुवात केली आहे. “आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचं आमचं धोरण जाहीर केलं आहे. समजा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असं सांगितलं, तर ते पाठित खंजीर खुपसल्यासारखं होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही विधानसभा स्वतंत्रच लढणार”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच, “आम्ही आजपासूनच जाहीर करतोय. आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत. त्यामुळे आम्ही आमची तयारी सुरू केली आहे. मित्रपक्षांना देखील आमचा संदेश आहे की तुम्हीही तयारी सुरू करा”, असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सुनावल्यानंतर त्यावर काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

“आम्हाला एकटं लढू द्या, मग बघा”, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचा इशारा!

दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील आज मुंबईत बोलताना स्वबळाची मागणी केली. आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची परवानगी द्या, मग बघा, असा इशाराच त्यांनी दिला आहे. “काल-परवापर्यंत काँग्रेसचा कॉग्निझन्स लोक घेत नव्हते. आज फक्त काँग्रेस काय करतेय हे बघत आहेत. मग ते मुंबई असो वा महाराष्ट्र असो. माझी तुमच्याकडे विनंती आहे. राहुल गांधींना विनंती आहे. सोनिया गांधींना विनंती आहे. आम्हाला एकटं (स्वबळावर) लढू द्या. तेव्हा बघुयात किस मे है कितना दम”, असं भाई जगताप म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 7:21 pm

Web Title: shivsena vardhapan din uddhav thackeray slams congress on nana patole statements pmw 88
Next Stories
1 लसीकरण घोटाळा : नागरिकांना आवाहन करत आदित्य ठाकरे म्हणाले…
2 “आम्हाला एकटं लढू द्या, मग बघा”, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचा इशारा!
3 “मुंबईचा मतदार शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”
Just Now!
X