शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसापूर्वी म्हणजे २३ जानेवारीपूर्वी शिवाजी पार्क येथे त्यांचे उद्यानरुपी स्मारक करण्याची शिवसेनेची तयारी असून महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून या बाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर मांडला जावा, यासाठी सेनेचे नेते आग्रही आहेत. दरम्यान शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांच्या एका संस्थेने पार्कातील आजी-आजोबा उद्यान अधिक चांगले करून त्यालाच स्मारकाचे स्वरुप द्यावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्काराची जागा शिवसेनेने मोकळी करून दिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारील मोकळ्या जागेवर ४० बाय २० फुटांचे उद्यान बनविण्याची शिवसेनेची योजना आहे. याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्तावही मंजूर करण्यात आला. मात्र आयुक्तांकडून या प्रस्तावाचा अभ्यास करण्यात येत असून पालिका प्रशासनाने उद्यानाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिका सभागृहात आणणे आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात सदर जागेत कोणतेही बांधकाम झाल्यास ते अनधिकृत समजले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र ही मोकळी जागा लाकडी खांब व पत्रे लावून बंदिस्त करण्यात आली असून पालिका अधिकारी त्याबाबत मौन पाळून आहेत. शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस २३ जानेवारी रोजी येत असून त्यापूर्वी तेथे सुंदर उद्यानरुपी स्मारक बनविण्यासाठी सेनेचे नेते आग्रही आहेत, असे सूत्रांनी सांगितले.