विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात सोमवारी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये घोषणायुद्ध रंगले. काही महिन्यांपूर्वी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱया या दोन पक्षांमध्ये दरी निर्माण झाली असून, त्याचाच प्रत्यय सोमवारी विधानभवनात आला. शिवसेनेच्या आमदारांकडून ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणा देण्यात येत होत्या, तर भाजपच्या आमदारांकडून ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी सुरू होती. दरम्यान, हंगामी अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनी सोमवारी २०० आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. उर्वरित सदस्यांना मंगळवारी शपथ देण्यात येणार आहे. शपथग्रहण झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
शिवसेनेचे सर्व आमदार भगवे फेटे आणि शिवसेनेचे उपरणे घालूनच विधानभवनात दाखल झाले. विधानभवनात दाखल झाल्यापासूनच त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. दुसरीकडे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना उमेदवार देणार असल्याची माहिती पक्षाच्या प्रवक्त्या नीलम गोऱहे यांनी सोमवारी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवार देतील, त्याला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठिंबा देणार की नाही, हे अद्याप माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सूत जुळण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली असून, त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. सामान्यपणे विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा उमेदवाराला विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाते. मात्र, सद्यस्थितीत विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. १२२ सदस्यांसह भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात शिवसेना अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेत शिवसेनेचे ६३ आमदार आहेत.