विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका ट्विटवरुन शिवसेना आणि त्यांच्यात पुन्हा ट्विटर वॉर रंगलं आहे. सुशांतसिंह आत्महत्येचे प्रकरण हाताळण्यावरुन अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलंय. त्यावर आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे. “मॅडम तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरवसा नसेल तर!” असं म्हणत युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांना उत्तर दिलंय.

आणखी वाचा- सुशांत मृत्यू प्रकरण : अमृता फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाल्या…

अमृता फडणवीस यांनी काय ट्विट केलं होतं?

“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांबाबत कुठेही उल्लेख केला नव्हता. मात्र आता युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.  मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !! असं उत्तर वरुण सरदेसाई यांनी दिलं आहे.

आणखी वाचा- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला सक्तीने केलं क्वारंटाइन

बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. त्यावरून सोमवार सकाळपासून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी ट्विट करताच आता अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यात ट्विटर वॉर रंगल्याचं चित्र आहे.