विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपातून शिवसेनेने माघार घेतली आहे. शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेनं या संपातून अचानक माघार घेतली आहे. त्यामुळे बेस्ट कर्माचाऱ्यांच्या संपात फूट पडलीये. सोमवारी मध्यरात्रीपासून जवळपास 30 हजार कर्मचारी संपावर गेल्याने आज सकाळपासून मुंबईत एकही बस आगारातून बाहेर पडली नव्हती. परिणामी चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आज कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये बैठक झाली, पण त्यात कोणताच तोडगा निघाला नाही. मात्र, आता शिवसेनेने या संपातून माघार घेतल्यामुळे उद्या या संपाला कसा प्रतिसाद राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय आहेत मागण्या –
बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या असून यामध्ये प्रथम २००७पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्माचाऱ्यांना मिळणाऱ्या रुपये ७३९० या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतननिश्चिती केली जावी तसेच एप्रिल २०१६पासून लागू होणाऱ्या नव्या वेतनकरारावर तातडीने काम सुरु करावे. बेस्टचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात सामावून घेण्याबाबत मंजूरी देण्यात आलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे. तसेच २०१६-१७ आणि त्यापुढील वर्षासाठी पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस, निवासस्थानाचा प्रश्न तसेच अनुकंपा भरती प्रक्रिया तातडीने सुरु करावी या मागण्या बेस्ट कर्मचारी संघटनेने प्रशासनासमोर ठेवल्या आहेत.