अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी गेलेल्या स्पीड बोटीला झालेल्या अपघातानंतर ही बोट समुद्रात बुडाली. या बोटीत एकूण २० जण होते. त्यातील १९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र त्यातील एकाचा या घटनेत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सिद्धेश पवार असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला सिद्धेश याचे गायब होता असे म्हटले जात होते. मात्र बोटीत एक मृतदेह सापडला आणि तो सिद्धेशचाच असल्याचे स्पष्ट झाले. सिद्धेशचे चार महिन्यांपूर्वीच कोल्हापूर येथे लग्न झाले होते. पोहता येत नसल्याने त्याचा या घटनेत मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्याचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. सिद्धेश आपल्या मामांबरोबर शिवस्मारकाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी गेला होता. मात्र त्याचवेळी काळाने त्याच्यावर घाला घातला.

बोटीला झालेल्या अपघातामुळे शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तसंच बचावकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर आणि अन्य दोन बोटीही रवाना झाल्या होत्या. यामध्ये इतरांना वाचवण्यात यश आले असले तरीही सिद्धेशचा मात्र यामध्ये बळी गेला. बोट शिवस्मारकाच्या जवळ पोहोचली असताना दुपारी सव्वाचारच्या सुमारास ती खडकाला धडकली, त्यानंतर ही बोट बुडाली. गिरगावजवळील समुद्रात खडकाला बोट धडकल्याने हा अपघात झाला. बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीला आजपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार होती. शिवस्मारक उभारणीचे कंत्राट “एल ऍण्ड टी’ म्हणजेच लार्सेन आणि टुब्रो कंपनीला दिले आहे. खरंतर प्रत्यक्ष बांधकाम 12 मार्च 2018 रोजी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव ते आतापर्यंत सुरू झाले नव्हते. आज कुठे स्मारकाच्या उभारणीला सुरूवात होईल असं वाटत असताना स्पीड बोट बुडाल्यामुळे शिवस्मारकाची पायाभरणी आजही रद्द करण्यात आली आहे.