खासगी रुग्णालयात करोना व्हायरसवर उपचार अत्यंत महागडे ठरत आहेत. अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात आहे. सांताक्रूझमध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या एका वृद्धाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या रुग्णावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पंधरा दिवस आयसीयूमधील उपचारासाठी रुग्णालयाकडून तब्बल १६ लाख रुपये बिल आकारण्यात आले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

“दिवसाला एक लाख रुपये उपचाराचा खर्च कुठल्याही मध्यवर्गीय माणसाला परवडणारा नाही. रुग्णालयाने आकारलेले बिल आमच्यासाठी एक मोठा धक्का आहे” असे मृत व्यक्तीच्या मुलाने सांगितले. जुहू येथील एका खासगी रुग्णालयात या Covid-19 पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु होते. रुग्णालयाने जास्त बिल आकारण्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

“रुग्णाला गंभीर अवस्थेत असताना इथे आणले होते. काही अवयव निकामी झाले होते. आम्ही त्यांच्यावर उत्तम उपचार केले पण त्यांचा मृत्यू झाला” असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. करोनावरील उपचारासाठी खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. “रुग्णालयाने औषधोपचारासाठी ८.६ लाख रुपये आणि कोविड चार्जेसपोटी २.८ लाख रुपये आकारले. वडिल रुग्णालयात असताना आम्ही क्वारंटाइन असल्यामुळे घरीच होतो. उपचार सुरु असताना रुग्णालयाकडून खर्चाची कोणतीही माहिती देण्यात आली नाही” अशी तक्रार रुग्णाच्या मुलाने केली आहे.

“रुग्णालयात दाखल करताना ६० हजार भरले. दुसऱ्यादिवशी वडिलांचे डायलासिस सुरु केल्याचे व त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याचे सांगितले. ई-मेल, फोनच्या माध्यमातून मी त्यांना पुढील उपचारासाठी संमती दिली” असे रुग्णाच्या मुलाने सांगितले. “मी ३.४ लाख रुपये बिल भरल्यानंतर दोन दिवसात मला रुग्णालयाच्या अकाऊंट खात्यातून फोन आला. मी पैसे भरले नाहीत तर ट्रीटमेंट बंद होईल असे त्यांनी सांगितले” असा आरोप मृत रुग्णाच्या मुलाने केला आहे. रुग्णालयाने मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली पण त्यासाठी आठ हजार रुपये आकारले” अशी माहिती मुलाने दिली.