काशिमीरा येथील शामू गौड या फळविक्रेत्याची दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हत्येचे कारण स्पष्ट होत नव्हते. स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे आणि अनुभवाच्या आधारे सुगावे जुळवले. पण हत्येचे कारण समोर आले आणि पोलीसही चक्रावले..

६ एप्रिल २०१७. शामू गौडा (४०) आपले दुकान बंद करून रात्री घरी आला. रात्री बाराच्या सुमारास दाराची बेल वाजली. शामूनेच दार उघडले. दारात दोन अनोळखी इसम उभे होते. त्यांनी शामूला एका दुकानाच्या गोडाऊनची चावी मागितली. शामू गोंधळला. एवढय़ात एकाने आपल्याकडील बंदूक काढून शामूच्या छातीवर गोळी चालवली. शामू खाली कोसळला. ते दोघे घरात शिरणार एवढय़ात जखमी शामूने धडपडत दार लावले. गोळीबाराचा आवाज ऐकून शामूची पत्नी संगीता आली. हल्लेखोर मोटारसायकलीवरून पळून गेले. जखमी शामूला मीरा रोडच्या भक्ती वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हल्लेखोरांनी अगदी जवळून गोळी झाडल्याने खूप रक्तस्राव झाला होता आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. शामू गौडा हा मीरा रोडजवळील काशिमिरा येथील पेणकर पाडा येथे पत्नी संगीता आणि दोन मुलांसह रहात होता. त्याचे फळ विक्रीचे दुकान होते. एका फळविक्रेत्याची हत्या गोळय़ा झाडून का केली गेली असावी, हा प्रश्न काशिमिरा पोलिसांना पडला.

ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमिरा युनिटचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल वाघ हे गडचिरोलीला साक्षीसाठी गेले होते. या हत्येच्या तपासासाठी पोलीस अधीक्षकांनी त्यांना ताबडतोब बोलावून घेतले. प्रुफल्ल वाघ आणि त्यांच्या पथकाने गौड हत्येचा तपास सुरू केला. शामूच्या पत्नीकडे चौकशी केली. त्याचे कुणाशी व्यावसायिक शत्रुत्व नव्हते. पण याच परिसरात राहणाऱ्या सुनील रजक याच्याकडून शामूने काही पैसे घेतले होते, अशी माहिती संगीताने दिली. पोलिसांनी सुनीलकडे चौकशी केली पण काही विशेष माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांनी सुनीलवर पाळत ठेवली व त्याच्या मोबाइलचे ‘कॉल डिटेल्स’ तपासून पाहिले. यातील एका क्रमांकाची माहिती सुनीलने पोलिसांना दिली नव्हती. या क्रमांकावर काही विशिष्ट मोबाइल क्रमांकावरून मीरा रोड, काशिमिरा आणि नालासोपारा येथून फोन येत होते. परंतु, हत्येच्या दिवशी सुनील आपल्या घरीच होता. त्यामुळे त्याच्याविरोधात काही पुरावा नव्हता. मग पोलिसांनी त्याची पाश्र्वभूमी खणून काढण्यास सुरुवात केली. २०१२मध्ये झारखंडमध्ये त्याच्यावर पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. या आरोपातून त्याची पुराव्याअभावी निदरेष सुटका झाली होती. सुनीलची ही मयत पत्नी पूर्वी मीरारोडमधील एक बारमध्ये बारबाला होती. तिच्याकडे अफाट संपत्ती होती. याच संपत्तीच्या वादातून सुनीलने तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याचदरम्यान, सुनीलचे शामूची पत्नी संगीता हिच्याशी अनैतिक संबंध जुळले. यातून तो संगीताला पैसे पुरवत होता. पण या पैशासाठी शामूची हत्या केली जाईल, अशी शक्यता पोलिसांना वाटत नव्हती. त्यामुळे त्यांनी दुसरी बाजू तपासण्यास सुरुवात केली.

सुनीलला ज्या विशिष्ट क्रमांकावरून फोन येत होता, तो नालासोपाऱ्यातील सुदीप रजक या तरुणाच्या नावावर होता. हत्येच्या दिवशी, ७ एप्रिलला सुदीप व त्याच्यासोबत राहणारे अन्य काही जण अचानक बेपत्ता झाले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी सुदीपच्या गावचा पत्ता शोधून काढला व झारखंड येथून त्याला ताब्यात घेतले. सुदीपने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली व राजेश रविराज याने यासाठी आपल्याला पाच लाखांची सुपारी दिल्याचेही पोलिसांना सांगितले. त्यामुळे आता पोलिसांपुढे राजेशला शोधण्याचे आव्हान उभे ठाकले.

त्याचवेळी सुनीलच्या पत्नीच्या हत्या प्रकरणात राजेशही आरोपी होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. सर्व धागे जुळले होते. त्याआधारे पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेतले. तेव्हा सुनीलने राजेशला सुपारी देऊन शामूची हत्या घडवून आणल्याची कबुली दिली.

या हत्येचे कारण समजताच पोलिसांनाही धक्का बसला. शामू आणि संगीताच्या १५ वर्षीय मुलीला वेश्याव्यवसायाला लावले तर खूप पैसे मिळतील, या विचाराने सुनीलने संगीताला त्यासाठी राजी केले. परंतु, शामूचा त्याला विरोध होता. त्यामुळे शामूचा काटा काढला तर संगीतासोबत प्रेमसंबंध कायम राहतील व त्याच्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलून पैसे कमवता येतील, असा सुनीलचा विचार होता. त्यानुसार त्याने राजेशला शामूच्या हत्येची सुपारी दिली. राजेशने सुदीप रजक, उमेश रविदास, बबलू रविदास आणि आशीष घोईया यांच्या मदतीने हत्येची योजना आखली. विशेष म्हणजे बबलू आणि आशीष यांना या हत्येची माहिती नव्हती. त्यांना केवळ पिस्तुले असलेले पार्सल मुंबईत पोहोचविण्याचे काम दिले होते. या मोबदल्यात त्यांना मुंबईला नोकरी लावून देणार होते. सुदीप आणि उमेशने मयत शामू्च्या घराची रेकी केली होती. रविदासने त्यांना प्रत्येकी १ लाख रुपये दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमिरा युनिटचे प्रमुख प्रफुल्ल वाघ यांच्यासह अभिजित टेलर, विजय ढेमरे, अशोक पाटील, अविनाश गरजे, राजेश श्रीवास्तव आदींच्या पथकाने या हत्येचा छडा लावून आरोपींना गजाआड केले. मात्र, राजेश अजूनही फरार आहे. शामूच्या मुलीला वेश्याव्यवसायत ढकलण्याचे कूकर्म साध्य करण्यासाठी सुनीलने शामूच्या हत्येचेही कूकर्म केले. पण पोलिसांच्या तपासकौशल्यामुळे त्याचा बेत फसला.