रेल्वे स्थानकात काम करणाऱ्या बूटपॉलिश कामगारांची व्यथा

मुंबई : टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्या रेल्वे बूटपॉलिश कामगारांचे जगणे कठीण झाले आहे. घरातील पैशाबरोबरच उधारीवरील पैसाही संपल्यामुळे हात कोणापुढे पसरणार असा सवाल करु लागले आहेत. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात काम करणाऱ्या बूटपॉलिशवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कसारा, खोपोली,पनवेल स्थानकापर्यंत जवळपास २०० आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरापर्यंतच्या स्थानकांवर एकू ण १२५  बूटपॉलिश कामगार काम करतात. दर दिवशी २०० ते ३०० रुपयाप्रमाणे त्यांची कमाई होते. रोजच्या कमाईवरच त्यांचे जगणे सुरू असते. परंतु दररोजचे उत्पन्न टाळेबंदीमुळे गमवावे लागले. बहुतांश बूटपॉलिश कामगार हे मूळचे बिहार, उत्तरप्रदेशमधील आहेत. उत्पन्नच बंद झाल्याने काही श्रमिक रेल्वेने जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र गावी गेल्यानंतरही विलगीकरणातच राहावे लागणार असल्याने कमाई शक्य नाही. परिणामी गावीही उपासमार टळणार नाही, अशी भीती त्यांना आहे.

बदलापूरला एका चाळीत राहणारे आणि मुंबई सेन्ट्रल स्थानकात बूट पॉलिशचे काम करणारे ४१ वर्षीय अनिल बिलासराम यांना आतापर्यंत काहींनी थोडीफार अन्नधान्याची मदत के ली. आता तेही मिळेनासे झाले आहे. बूटपॉलिश कामगारांच्या सोसायटी आणि संघटनांनी किरकोळ मदत के ली. मात्र ही मदत किती दिवस पुरणार? आता उधारीवर घेतलेले पैसेही संपल्याने आणखी कोणापुढे हात पसरणार, असा प्रश्न अनिल यांनी के ला. त्यांना दोन लहान मुले असून ती शाळेत आहेत. पत्नी घरीच असते. त्यामुळे अनिल यांच्यावरच कु टुंबाची जबाबदारी आहे. गाव बिहारमध्ये असले तरी मुंबईने बरेच काही दिले. त्यामुळे या शहराला सोडून जाणेही शक्य नसल्याचे ते म्हणाले.

अंधेरी स्थानकात गेली १० वर्ष बूटपॉलिशचे काम करणाऱ्या हिरालाल रामचीही (३८)अशीच काहीशी व्यथा. रोजचे उत्पन्न बंद झाल्याने उधारीवर पैसे घेऊन अन्नधान्य आणत असल्याचे सांगतात. तर शेजारी राहणारेही काही प्रमाणात मदत करतात. त्यावर एक महिना कसातरी काढला. टाळेबंदी पुढेही वाढण्याची शक्यता असल्याने येता काळ आणखी कठीण असल्याचे ते सांगतात.

संघटनांकडून बूटपॉलिश कामगारांना मदत के ली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासन व राज्य शासनाने याकडे लक्ष देण्याची आमची मागणी आहे.

– रामकृष्ण मेहरा, महाराष्ट्र रेल्वे बूटपॉलिश कामगार महासंघ