News Flash

चला, शूज् डिझायनर बनूया!

डी. एस. हायस्कूलमध्ये अनोखी ‘बूट रंगवा’ कार्यशाळा

चला, शूज् डिझायनर बनूया!

जगभरात पादत्राणांचं डिझायनिंग (शूज् डिझाइन) शिकण्यासाठी मोठमोठ्या कला महाविद्यालयांमध्ये महागडे अभ्यासक्रम चालवले जातात. सर्वसामान्य कलाविद्यार्थ्यांसाठी अशा अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवणं, हे एक स्वप्नच राहतं. पण सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मात्र शूज डिझाइन कसं करावं याचा तंत्र आणि मंत्र मिळाला. निमित्त होतं- शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘बूट रंगवा’ अर्थात शू डिझाइन कार्यशाळेचं.

शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या कलाजाणीवा समृद्ध होऊन त्यांच्यात चित्रकला, हस्तकला, शिल्पकला अशा विविध कलांबद्दल प्रेम निर्माण व्हावं, यासाठी डी. एस. हायस्कूलमध्ये चित्रपतंग कलासमूहाच्या सहकार्याने कलासाक्षरतेचे विशेष उपक्रम वर्षभर आयोजित करण्यात येतात. या उपक्रमांतर्गत नुकतीच शाळेतील पाचवीच्या विदयार्थ्यांसाठी ‘बूट रंगवा’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेअंतर्गत, चित्रपतंगच्या संचालिका प्राची आगवणे आणि मार्गदर्शिका निकिता शेलार यांनी सुरुवातीला या विद्यार्थ्यांसमोर जगभरातील विविध प्रकारच्या बुटांचे आणि चपलांचे डिझाइन्सबाबतचे सादरीकरण केले. याविषयी अधिक माहिती देताना प्राची आगवणे यांनी सांगितलं की, “मुलांनी त्यांचे वापरात नसलेले जुने बूट घरातून आणले होते. आधी आम्ही त्यांना त्यांच्या मनातील थीम-कल्पना कागदावर मांडायला सांगितली, आणि त्यानंतर एक्रालिक रंगांनी त्यांनी त्यांचे बूट रंगवले. मुलांनी रंगवलेल्या चपला-बूट पाहून आम्हीसुद्धा थक्कच झालो.” “जुने वापरात नसलेले बूट मुलं फेकून देतात. पण अशा प्रकारे शूज डिझाइनची कार्यशाळा घेतल्यामुळे मुलांना ‘टाकाऊतून टिकाऊ’ हे तत्व न समजलंच, पण त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वावसुद्धा मिळाला”, असं मत निकिता शेलार यांनी व्यक्त केलं.

एकेकाळी धारावी ही ‘चर्मोद्योगाची राजधानी’ होती. शाळेनजीकच्या परिसरात चर्मोद्योगाशी संबंधित असंख्य कारागीर राहतात. “पादत्राण निर्मितीच्या व्यवसायात सर्वात महत्वाचं असतं ते डिझाइन. कपडे असोत की चपला, आपण वापरतो त्या प्रत्येक वस्तूत किंवा उत्पादनात डिझाइनच्या रुपाने कला ही दडलेलीच असते. ‘बूट रंगवा- शू डिझाइन’सारख्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना डिझायनिंगचं महत्व समजावं आणि त्यांच्यात डिझायनिंगबाबत गोडी निर्माण व्हावी, हाच हेतू होता”, असं मत डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं.

“दिवसेंदिवस सरकारी अनुदान कमी होत चालल्यामुळे आज मुंबई परिसरातील असंख्य शाळांमध्ये चित्रकला-हस्तकला विषयांसाठीचे शिक्षकच नाहीत. पण डी. एस. हायस्कूलमध्ये मात्र विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवणारे नियमित शिक्षक तर आहेतच, पण त्याचबरोबर ‘चित्रपतंग कलासमूहा’च्या सहकार्याने शाळेत वर्षभर दृष्यकलाविषयक नियमित वर्ग व विविध कार्यशाळा नियमितपणे आयोजित केल्या जात असतात, असंही राजेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 2:04 pm

Web Title: shoes design workshop
Next Stories
1 पालघर पुन्हा भूकंपाने हादरले; गुजरात सीमेपर्यंत जाणवले धक्के
2 कुलभूषण जाधवांची सुटका हीच शांततेची किंमत – उद्धव ठाकरे
3 मुंबई सुरक्षितच राहणार
Just Now!
X