15 July 2019

News Flash

मुंबई परिसरातल्या मूळ नावांसाठी शिवसेना आक्रमक, ३० जूनपर्यंत मुदत

मुंबईतल्या अनेक भागांची मूळ नावं बदलून नवीन इंग्रजी नावं देण्याचा प्रघात पडत असून शिवसेनेने यास विरोध दर्शवला आहे.

उद्धव ठाकरे

मुंबईतल्या अनेक भागांची मूळ नावं बदलून नवीन इंग्रजी नावं देण्याचा प्रघात पडत असून शिवसेनेने यास विरोध दर्शवला आहे. गिरणगावातल्या परळ, लोअर परळ व प्रभादेवी आदी भागाला अप्पर वरळी म्हणण्यासारखे प्रघात पडत असून अशी अमराठी नावं देण्यास शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. मुंबई शहरातली विविध भागांना जी मूळ नावं आहेत, ती ओळख पुसली जाता कामा नये अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

संबंधित बदल करण्यासाठी शिवसेनेने ३० जूनपर्यंतची मुदत दिली आहे. जे दिलेल्या मुदतीत सर्व संबंधित पाटयांवर मूळ नावं लिहिणार नाहीत त्या पाटयांना काळे फासा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

याआधी मराठी पाट्या असाव्यात असा आग्रह मनसेनं धरला होता. २००८ च्या दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलला. त्यावेळी रेल्वेभरतीत मराठी तरुणांना प्राधान्य मिळाले पाहिजे यासह मराठी पाटयांचा विषय मनसेने लावून धरला होता. मनसेच्या आक्रमक इशाऱ्यानंतर मुंबईत अनेक दुकानांवर मराठी पाटया दिसू लागल्या होत्या.

पण पुढे मनसेचे तेरा आमदार निवडून आले परंतु नंतर हा मुद्दाही हळूहळू मागे पडला. आता मात्र शिवसेनेने मुंबईच्या भागांना असलेली जुनी पारंपरिक नावं पुसली जाऊ नयेत असा मुद्दा हाती घेतला आहे. येत्या वर्षभरात असलेल्या निवडणुकांचा विचार करता, शिवसेनेच्या मूळ नावांच्या मुद्यानंतर मनसे मराठी नावांचा मुद्दा पुन्हा घेईल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांनीही भाजपाच्या पारड्यात मतं टाकल्यानंतर त्यांना पुन्हा आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मराठी नावांचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

First Published on June 14, 2018 4:14 pm

Web Title: shop name plates in marathi shivsena uddhav thackeray