News Flash

अग्नितांडवामुळे राखरांगोळी

करोनामुळे आर्थिक घडी विस्कटली असतानाच आगीमुळे मोठे नुकसान

करोनामुळे आर्थिक घडी विस्कटली असतानाच आगीमुळे मोठे नुकसान; दुकानदार हवालदिल, रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश

मुंबई : करोनाच्या संकटामुळे आर्थिक घडी विस्कटलेली असतानाचा आगीने दुकानाची राखरांगोळी केल्यामुळे ड्रीम्स मॉलमधील दुकानदार हवालदिल झाले आहेत. काही दुकानदारांनी तर मॉलमधील दुकानातील विक्रीयोग्य साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करीत वेळीच दुकानदारांना रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्याच वेळी आगीच्या विळख्यात अडकलेल्या सनराईज रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. दुकानदार आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या आक्रोशामुळे वातावरण हेलावून गेले होते.

कायम वाहतूक कोंडीत गुदमरणाऱ्या भांडुपच्या एलबीएस मार्गावरील ड्रीम्स मॉलच्या पहिल्या मजल्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली आणि क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. क्षणाक्षणाला मॉलच्या एकेका मजल्याला आगीचा विळखा पडत होता. तिसऱ्या मजल्यावरील सनराईज रुग्णालयालाही आगीने वेढा घातला. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. मात्र भडकणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट यांमुळे अग्निशमनात अडथळे येत होते. पहाट झाली तरीही आगीवर नियंत्रण मिळत नव्हते. आगीच्या ज्वाळा पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या. काळ्याकुट्ट धुराचे लोट मॉलमधून बाहेर पडत होते. त्यामुळे अग्निशमनात अडथळे येत होते. त्यातच सकाळी एलबीएस मार्गावरील वाहतूक सुरू झाली. वाहतूक कोडींमुळे पाण्याची रसद बंद होऊ नये म्हणून हा रस्ता शुक्रवारी सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. परिणामी, आसपासच्या परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पूर्व द्रुतगती मार्गावरही तशीच परिस्थिती होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचणींचा सामना करावा लागत होता. शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. पण काही वेळाने पुन्हा आगीचा भडका उडाला आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली.

मॉलमध्ये आग लागल्याचे समजताच अनेक दुकानदारांनी घटनास्थळी धाव घेतली. मॉलच्या नेमक्या कोणत्या भागात आग लागली आहे, ती कितपत पसरली आहे याची वारंवार ते चौकशी करीत होते.

मॉलच्या पाठीमागच्या बाजूच्या दुकानांमध्ये ही आग लागली होती.  पुढील भागातील दुकानांना आगीची झळ बसली नव्हती. आपले दुकान सुरक्षित असल्याचे समजताच काही दुकानदारांनी मॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर दुकानातील वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.

‘सनराईज’मधील रुग्णांना हलविले

ड्रीम्स मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील सनराईज रुग्णालयात ७६ करोनाबाधित रुग्ण दाखल होते. प्रसंगावधानता राखून काही रुग्ण तात्काळ रुग्णालयातून बाहेर पडले, तर आगीच्या घटनेचे वृत्त समजताच रुग्णांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. काही रुग्णांना मुलुंड येथील जम्बो रुग्णालय, भांडुप येथील फोर्टीस रुग्णालय, ठाण्यातील विराज रुग्णालय, वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना केंद्र, गोदरेज रुग्णालय, सारथी रुग्णालय, अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काही रुग्णांना गृहविलगीकरणाची मुभा देत घरी पाठविण्यात आले. अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रणेवर असलेले काही रुग्ण अडकले होते. या रुग्णांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शुक्रवारी पहाटेपर्यंत प्रयत्न करीत होते.

‘नियमबाह्य पद्धतीने रुग्णालयाला परवानगी’

‘ड्रीम्स मॉल’संदर्भात कायदेशीर वाद निर्माण झाला होता. त्यामुळे यासंदर्भात एनसीएलटीमध्ये खटला सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी एनसीएलटीने मॉलवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. पालिकेने मॉलचा पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे रुग्णालयाला परवानगी मिळण्यात अडचणी होत्या. मात्र गेल्या वर्षी मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला परवानगी देण्यात आली होती. पालिकेने ६ मे २०२०ला या रुग्णालयात अंशत: भोगवटा प्रमाणपत्र दिले होते. तसेच पालिकेच्या एस विभाग कार्यालयाच्या इमारत व कारखाने विभागाचे साहाय्यक अभियंता यांनी ना हरकत प्रमाणपत्र आणि कार्यकारी अभियंता इमारत प्रस्ताव विभाग (पूर्व उपनगर) यांनी रुग्णालय सुरू करण्यासाठी मंजुरी दिली होती. तसेच अग्निशमन अधिकाऱ्यांनी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य खात्याने नर्सिग होम अ‍ॅक्टनुसार रुग्णालयाला नोंदणी प्रमाणपत्र दिले होते. ३१ मार्चपर्यंत हे प्रमाणपत्र वैध होते. माजी खासदार संजय दिना पाटील यांनी पालिकेशी केलेल्या पत्रव्यवहारातून ही माहिती समोर आली आहे. तसेच सर्व अटी आणि शर्तीची पूर्तता न करताच नियमबाह्य़ पद्धतीने या रुग्णालयाला परवानगी दिल्याचा आरोप पाटील यांनी केला.

महापौरांचे चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी सकाळी भांडुपमधील घटनास्थळाला भेट दिली आणि दुर्घटनेची माहिती घेतली. मॉलमध्ये करोना रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून याबाबत र्सवकष चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महापौरांनी दिली. सनराईज रुग्णालय २८ फेब्रुवारी रोजी बंद करण्याचे निर्देश दिले होते. रुग्णालय ३१ मार्चपर्यंत बंद करू, असे रुग्णालय व्यवस्थापनाने पालिका प्रशासनाला सांगितले होते. करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हे रुग्णालय पुन्हा सुरू झाले. मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागलेली आग काही क्षणातच करोना के ंद्रात पसरली. त्यातून ही दुर्घटना घडली असून या ठिकाणी अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आली होती का, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले. यापूर्वी मुंबईमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर सर्व ठिकाणचे अग्निसुरक्षा यंत्रणेचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश अग्निशमन दलासोबत घेतलेल्या बैठकीत दिले आहेत. त्याचबरोबर सर्व करोना केंद्रांमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिल्याचे महापौरांनी सांगितले. आगीचा संपूर्ण अहवाल दोन दिवसांत सादर होतील. या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची भाजपची मागणी

अटी-शर्ती, नियम धाब्यावर बसवून उभारलेल्या भांडुपमधील एलबीएस मार्गावरील सनराईज रुग्णालयात करोना केंद्र सुरू करण्यात आले होते. नियम धाब्यावर बसवून रुग्णालयाला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांच्याविरोधात तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. या

संदर्भात स्थानिक नगरसेविकेने वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने १० जणांचा बळी गेल्याची बाब भाजपने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या निदर्शनास आणून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:41 am

Web Title: shopkeepers in dreams mall face huge loss due to fire zws 70
Next Stories
1 ७६२ रुग्णालये, नर्सिग होमचे अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष
2 पोलीस आयुक्तालयातील संशयास्पद हालचालींचा तपास सुरू
3 देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी आणखी दोन याचिका
Just Now!
X