पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वप्न अखेर साकार

जे शहर कधीच झोपी जात नाही, ते आता रात्रीही जागे राहणार आहे. मुंबईतील काही उपाहारगृहे, हॉटेल्स आणि मॉल्स २६ जानेवारीपासून २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबईत ‘रात्रजीवन’ सुरू करण्याचे युवा सेनेचे प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वप्न होते. ते २६ जानेवारीपासून साकार होत आहे. रात्रजीवनाच्या पहिल्या टप्प्यात निवासी भागात नसलेल्या हॉटेल्स-मॉल्स-मल्टिप्लेक्सचा समावेश करण्यात येणार असून काही कालावधीनंतर आढावा घेऊन आणखी काही ठिकाणांचा समावेश त्यात करण्यात येईल. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबईत ‘रात्रजीवन’ सुरू करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिकेने केलेल्या तयारीची माहिती दिली. रात्रजीवनाच्या संकल्पनेशी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निगडीत असल्याने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वेही या बैठकीला उपस्थित होते. मुंबईत २६ जानेवारीपासून ‘रात्रजीवन’ सुरू करण्यास या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आल्याचे समजते.

मुंबईतील सुमारे २५ मॉल्स आणि उपाहारगृहांनी २४ तास सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर निवासी भागातील आस्थापना आणि उपाहारगृहांना २४ तास सेवा देण्याची परवानगी देण्यात येईल. परंतु त्यासाठी अग्निसुरक्षा आणि सुरक्षाव्यवस्थेची अटक असेल, असे बैठकीला उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

नवीन कायद्यानुसार कोणतेही दुकान आणि आस्थापना २४ तास खुले राहू शकते. मात्र काही अटी घालण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ज्या आस्थापनाना स्वत:चे प्रवेशद्वार (गेटेड कम्युनिटी), सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत अशा मॉल आणि चित्रपटगृहांसारख्या आस्थापनांमधील दुकाने, उपहारगृहे सुरू ठेवता येतील. निवासी परिसरात नसलेल्या, पण पार्किंगची सुविधा असलेल्या ठिकाणी सुविधा असेल. याबाबत मॉल मालकांशी बैठक झाली असून सुरुवातीला शनिवार आणि रविवारी २४ तास मॉल सुरू ठेवण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. २७ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होईल, असे महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजेच २६ जानेवारीच्या रात्रीपासून मुंबईत ‘रात्रजीवना’ची सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात निवासी भागात नसणारी काही हॉटेल्स-मॉल्स-मल्टिप्लेक्स रात्रभर खुली राहतील. या उपक्रमाचे यशापयश पाहून आणखी काही भागांतील व्यावसायिक आस्थापने खुली करण्याबाबत निर्णय होईल, असे समजते. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने याबाबतचा प्रस्ताव पूर्वीच मंजूर केला होता. मात्र, मुंबई महापालिकेची सज्जता-पोलिसांचे कायदा-सुव्यवस्थेबाबतचे काही प्रश्न यामुळे त्याची अंमलबजावणी प्रलंबित होती.

मद्यविक्रीवरील बंधने कायम राहणार आहेत. चौपाटीसारख्या ठिकाणी खाद्यपदार्थ विकता येतील. आस्थापना २४ तास सुरू ठेवण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज भासणार नाही, पण जिथे कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल तेथे आम्ही बंधने घालू शकतो. 

– प्रवीणसिंह परदेशी, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

उपाहारगृहे २४ तास खुली ठेवण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे शहरातील पर्यटनवाढ आणि व्यवसायास चालना मिळेल. 

 निरंजन शेट्टी, आहार