मुंबई शहर तसेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीतील दुकाने व आस्थापने येत्या सोमवारपासून रात्री ११ पर्यंत, तर उपाहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली.

मुंबई शहर व मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीत सध्या दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत, तर उपाहारगृहे रात्री ११ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी होती. या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यानुसार दुकाने व आस्थापने रात्री ११ पर्यंत, तर उपाहारगृहे रात्री १ पर्यंत यापुढे उघडी राहतील.

दुकानांची वेळ वाढविण्यात आली असली तरी कमाल कर्मचाऱ्यांच्या ३० टक्के उपस्थितीची अट कायम ठेवण्यात आली आहे. उपाहारगृहे, फूडकोर्टसाठी यापूर्वी लागू असलेल्या विविध अटी कायम असतील. दुकाने, उपाहारगृहे यांच्यासाठी यापूर्वी लागू असलेले निर्बंध कायम राहतील, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्याकरिता लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आधीच्या तुलनेत काहीच बदल केलेले नाहीत. सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहतील, असेच मुख्य सचिव संजय कु मार यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. केंद्राने ६५ वर्षांवरील नागरिकांवरील निर्बंध काढून घेतले असले तरी राज्याच्या आदेशात तसा काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही.

उत्पन्नात ५० ते ७५ कोटींची वाढ होण्याचा अंदाज

उपाहारगृहे रात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिल्यामुळे रोजच्या उत्पन्नात ५० ते ७५ कोटीपर्यंतची वाढ होण्याची अपेक्षा ‘हॉटेल अँड  रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया’ या संघटनेने व्यक्त केली आहे.

सध्या ग्राहकांना रात्री ९.३० पर्यंत रेस्टॉरंटमध्ये पोहचावेच लागत होते आणि शेवटची ऑर्डर रात्री १०.३० वाजेपर्यंतच घेता येत होती. त्यामुळे मोठे नुकसान होत होते, अशी प्रतिक्रिया संघटनेने दिली.

या शहरांना आदेश लागू..

मुंबई शहर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, अलिबाग, पालघर-बोईसर, मीरा-भाईंदर, भिंवडी-निजामपूर आदी महानगर क्षेत्रातील शहरे.

आदरातिथ्य उद्योगाला मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याने आम्ही सरकारकडे उपाहारगृहे जास्त वेळ खुली ठेवण्यास परवानगी देण्याची विनंती करत होतो. या निर्णयामुळे उद्योगाच्या उत्पन्नात दररोज जवळजवळ ५० ते ७५ कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

– प्रदीप शेट्टी, ‘हॉटेल अँड  रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया’चे वरिष्ठ उपाध्यक्ष