मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा फतवा महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला आहे. हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर वादंग उसळला होता. आता याच लघुपटाचा तास महाराष्ट्रातील शाळांमध्ये पार पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगेश हडवळे यांनी दिग्दर्शित केलेला ३२ मिनिटांचा हा लघुपट जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानेही पाहिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तो दाखवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांना अशा प्रचारतंत्रात का ओढले जात आहे, असा सवाल काही शिक्षकांनी केला आहे. काही जिल्ह्य़ातील केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील मंगळवारी elearning. parthinfotech.in  या संकेतस्थळावर हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. तो सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळांमध्ये दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एमबीपीएस इंटरनेट स्पीड हवा, असेही शाळांना सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, अशा कोणत्याही सूचना शाळांना आमच्याकडून देण्यात आलेल्या नाहीत, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

वरकरणी सूचना साध्याच..

लघुपटाची सक्ती केलेली नाही किंवा तसे लेखी पत्रही नाही. मात्र, ‘शिक्षण विभागाचा कारभार हा हल्ली बहुतांशी व्हॉट्सअ‍ॅपवरूनच चालतो. त्यावरून वरिष्ठ सूचना देतात तेव्हा त्या शाळांना पाळाव्याच लागतात,’ असे एका शिक्षकांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Short film based on pm narendra modi will show in maharashtra school
First published on: 12-09-2018 at 03:32 IST