07 March 2021

News Flash

संक्षिप्त : उल्हास नदीत तिघे बुडाले

कल्याणजवळील मोहने उदंचन केंद्राजवळील उल्हास नदीच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा मंगळवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. सेंच्युरी कॉलनी भागात हे तरुण राहत होते.

| June 25, 2014 12:01 pm

कल्याणजवळील मोहने उदंचन केंद्राजवळील उल्हास नदीच्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा मंगळवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. सेंच्युरी कॉलनी भागात हे तरुण राहत होते. अश्विन संजीवन (१५), सूर्यमोहन सोमराज (१५), अविनाश मुसानी (१७) अशी त्यांची नावे आहेत.
मोहने उदंचन केंद्र येथे लहान बंधारा असल्याने येथे हे तरुण बंधाऱ्याच्या भिंतीवर बसून आंघोळ करीत होते. तिघांना पोहता येत नव्हते. यामधील सूर्यमोहनचा पाय घसरून तो बंधाऱ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी अविनाश, अश्विन पाण्यात उतरले. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघे नदीत बुडून जागीच मरण पावले. पालिका अग्निशमन दलाचे सुधाकर कुलकर्णी यांना याबाबतची माहिती मिळताच तातडीने दलाचे पथक प्रमुख यशवंत पवार उल्हास नदीवर पोहोचले. स्थानिक नागरिक व जवानांनी तरुणाचांचे मृतदेह बाहेर काढले.  

दोन पोलिसांना अटक ; भिवंडीमध्ये आदिवासी तरुणाला मारहाण
ठाणे  : भिवंडी तालुक्यातील एका आदिवासी तरुणाला निजामपूर येथील पोलीस ठाण्यात जबर मारहाण करण्यात आली असून या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात दोन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल ठाकरे (१६) असे मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून त्याच्यावर भिवंडी मिठपाडा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुलाचा भाऊ चंदन ठाकरे यांच्या फिर्यादीवरून पोलीसांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला व सोमवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली़  धीरज खरमुडे (२६) आणि जालिंधर भोजणे (२७) अशी त्यांची नावे आहेत.

अतिक्रमणविरोधी पथकावर हल्ला
मुंबई : रे रोड येथे अतिक्रमणविरोधी कारवाई करायला गेलेल्या पोलीस पथकावर झालेल्या दगडफेकीत दोन पोलिसांसह मुंबई पोर्ट ट्रस्टचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. वडाळा पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. रे रोड येथील व्हिजन हॉटेलसमोरील पारसी वाडय़ातील अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक मंगळवारी दुपारी गेले होते. या कारवाईच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध करत पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक तुरळकर, पोलीस हवालदार किरण रुद्रवंशी यांच्यासह मुंबई पोर्ट ट्रस्टचा एक कर्मचारी जखमी झाला. वडाळा पोलिसानी याप्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक केली.

शाळेची बस झाडावर आदळून चौघे जखमी
मुंबई : खासगी शाळेची बस झाडाला धडकून झालेल्या अपघातात तीन मुलांसह बस सहायक किरकोळ जखमी झाली. मंगळवारी सकाळी सात वाजता विक्रोळी येथे हा अपघात घडला. पार्कसाइट पोलिसांनी या प्रकरणी बसचालकाला अटक केली आहे. पोद्दार एज्युकेशन कॉम्प्लेक्स शाळेची बस मंगळवारी विक्रोळी येथील सन सिटी कॉम्प्लेक्स येथून मुलांना घेऊन निघाली होती. भरधाव वेगात असलेली ही बस रस्त्यालगतच्या झाडाला आदळली. स्थानिकांनी त्वरित मदत केली. जखमींवर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे शाळेचे वाहतूक व्यवस्थापक एन. के. शर्मा यांनी सांगितले.

ठाण्यात आज पाणी नाही
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या रालयादेवी प्रभाग समिती परिसरातील इंदिरानगर जलकुंभाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून त्यामुळे येथून होणारा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या वेळात सुमारे २४ तास बंद राहणार आहे.
त्यामुळे सावरकर नगर, म्हाडा-डवलेनगर, इंदिरानगर, आंबेवाडी, साठेनगर, लक्ष्मीपार्क, विठ्ठल क्रिडामंडळ, लोकमान्यनगर लाकडीपुल या परिसरातील पाणी पुरवठा बंद राहील. तर पुढील दोन दिवस या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.  

ठाणे-वाशीत तीन लाखांची वीज चोरी
ठाणे : महावितरणच्या वतीने वीज चोरीला आळा घालण्यासाठी मे महिन्यामध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये भांडूप परिमंडळातील ९१ वीजचोऱ्या उघडकीस आल्या़  यातून ३ लाख २७ हजार ६७६ रुपये किमतीच्या ३९ हजार ३१६ युनीट विजेची चोरी झाल्याचे उघड झाले.  ९१ पैकी ३९ वीज ग्राहकांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आह़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 12:01 pm

Web Title: short news from mumbai 2
टॅग : Mumbai News
Next Stories
1 एलबीटीऐवजी ‘व्हॅट’वर अधिभार!
2 कॅम्पा कोलातील बेघरांमध्ये.. उद्योजक, प्राध्यापक, संपादक, कंपनीचे मालकही..
3 तीन दिवसांत पाच लाख पासची विक्री
Just Now!
X