मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे गोरेगाव पश्चिम येथे पिंपळाचे झाड कोसळून रविवारी एका गटई कामगाराचा मृत्यू झाला. गणेश अहेर (३०) असे त्याचे नाव असून त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. महापालिकेच्या सिद्धार्थ रुग्णालयाच्या जवळ इमारत क्रमांक ३५ येथे अहेर यांचा चर्मकार व्यवसायाचा स्टॉल आहे. शनिवारी दुपारी येथील पिंपळाचे झाड लगतच्या भिंतीसकट या स्टॉलवर कोसळले. दुर्घटनेत जखमी झालेल्या अहेर यांना सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. वृक्ष कोसळून मृत्यू ओढावल्यास महापालिकेकडून मृताच्या वारसांना एक लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येते.

ओढय़ात विद्यार्थिनी वाहून गेली
ठाणे : ठाण्याजवळील येऊरच्या जंगलात पावसाळी सहलीसाठी गेलेली कीर्ति नवराथ (११) ही विद्यार्थिनी रविवारी दुपारी ओढय़ात पडून वाहून गेली. अग्निशमन दल व पालिकेच्या आपत्कालीन पथकाचे जवान तिचा शोध घेत आहेत. ठाण्यातील संभाजीनगरमधील एका खासगी शिकवणी वर्गातील ३३ विद्यार्थी व तीन शिक्षकांचा एक गट रविवारी सकाळी येऊरच्या जंगलात पावसाळी सहलीसाठी गेला होता. रामंदिर जवळील ओढय़ात उतरले असताना कीर्ति अचानक वाहून गेल्याचे सहकारी विद्यार्थ्यांना समजले. अग्निशमन दलाच्या साहाय्याने बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध सुरू आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.  

कल्याण तहसील ‘एसएमएस’ सुविधा देणार
कल्याण : कल्याण तहसीलदार कार्यालयातून नागरिक, विद्यार्थी, पालकांना विविध प्रकारच्या दाखल्यांची माहिती ‘एसएमएस’ सुविधेच्या माध्यमातून देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली. अधिवास, उत्पन्न, जात आदी विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिकांना तहसीलदार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. अनेक वेळा वेळेत दाखले उपलब्ध होत नाहीत. या सर्व संधीचा काही दलाल गैरफायदा उचलून नागरिकांची लुबाडणूक करतात. अलिकडेच त्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने तहसील कार्यालयात आंदोलन केले होते. नागरिकांना फेऱ्या न मारता दाखले मिळावेत यासाठी तहसील प्रशासन ‘एसएमएस’द्वारे दाखल्यांच्या माहिती सुविधा देण्याचा विचार करीत आहे.

गुंगीचे औषध देऊन जनावरे चोरण्याचा प्रयत्न
ठाणे : शिळफाटा परिसरात दोन बैल व गाईला गुंगीचे औषध देऊन चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अनोळखी चोरटय़ांविरुद्ध डायखर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी तिन्ही जनावरे नईम शेख यांच्या फार्म हाऊससमोर चरत असताना, दोन अनोळखी चोरटय़ांनी त्यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.

ठाण्यात ट्रेलरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
ठाणे : ठाण्याजवळील गायमुख येथे एका ट्रेलरने मोटारसायकलस्वाराला दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रेलर चालक पळून गेला. मेहबूब खान (२५, कापूरबावडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मेहबूब खान शनिवारी दुपारी मीरारोड येथून ठाण्याकडे मोटारसायकलवरून येत होता. गायमुख जवळील उतारावर समोरून येणाऱ्या ट्रेलरने मेहबूबला जोराची धडक दिली. त्याचा जागीच मृत्यू झाला. कापूरबावडी पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून फरार चालकाचा शोध सुरू आह़े

विद्यार्थिनी बलात्कारप्रकरणी तिसरा आरोपी अटकेत
डोंबिवली : गेल्या महिन्यात डोंबिवली एमआयडीसीतील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी मानपाडा पोलिसांनी सुनील बागडी या तिसऱ्या आरोपीला अटक केली. कल्याण न्यायालयाने बागडीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यापूर्वी याप्रकरणात रोहन भोईर, अबू अन्सारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुनील हा विद्यार्थिनी शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या खानपान कक्षात काम करतो. त्याने पीडित तरुणीला पाजण्यात आलेला रस भोईर, अन्सारी यांना आणून दिल्याचा संशय पोलिसांना आहे.