कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी जमा

परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या व आर्थिक चणचण असलेल्या कुटुंबातील लहान मुलांना मदत मिळावी यासाठी टाटा रुग्णालयाने २०१५ मध्ये दत्तक योजना सुरू केली होती. मात्र या योजनेत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता टाटा रुग्णालय कंपन्याच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी जमा करीत आहे.

दरवर्षांला टाटा रुग्णालयाच्या बाल रुग्ण विभागात १८०० नवीन लहान रुग्णांवर उपचार केले जातात. दररोज १५ वर्षांखालील ६० रुग्ण टाटा रुग्णालयात दाखल होतात. आणि २५० रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात तपासणी करतात.

तर टाटाच्या डे केअर केंद्राअंतर्गत केमोथेरेपी करण्यासाठी दररोज १०० रुग्ण असतात. यातील ५० टक्क्य़ांहून अधिक रुग्ण हे गरीब घरातील असतात. त्यांना कर्करोगाच्या उपचारासाठी खर्च करणे शक्य होत नाही. मात्र टाटाला हा खर्च करणे शक्य नसल्याने २०१५ मध्ये दत्तक योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत कर्करुग्णालयातील एका मुलाला दत्तक घेऊन त्याचा वर्षभराचा उपचाराचा खर्च करणे अपेक्षित होते. पहिल्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये ४७ मुलांना दत्तक घेण्यात आले. यावर्षी टाटा ट्रस्टनेच १०४ मुलांना दत्तक घेतले होते. तर दुसऱ्या वर्षी २०१६ मध्ये फक्त १६ मुलांना बाहेरुन दत्तक घेण्यात आले. तर सीएसआरअंतर्गत ३५८ मुलांना दत्तक घेण्यात आले. २०१७ मध्ये २४ मुलांना दत्तक घेण्यात आले असून १७२ मुलांना सीएसआरअंतर्गत मदत देण्यात आली आहे.

तीन वर्षांत दत्तक योजनेअंतर्गत केवळ  ८७ मुलांना दत्तक घेण्यात आले असून सीएसआरअंर्तगत ५३० मुलांना आणि टाटा ट्रस्टअंतर्गत १०४ मुले दत्तक घेण्यात आली. गेल्या तीन वर्षांत सीएसआरअंतर्गत १८ कोटींची निधी जमा करण्यात आला असून टाटा रुग्णालयात कर्करोगानेग्रस्त असलेल्या लहान मुलांच्या उपचारासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना जेवण पूरविण्यासाठीही या पैशांचा वापर केला जातो, असे पेडियाट्रीक विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बनावली यांनी सांगितले.