दररोज नऊ हजार रुग्णांची नोंद; पालिकेच्या ताफ्यात ४४७ रुग्णवाहिका

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत करोना संसर्गाने थैमान सुरू असून प्रतिदिन रुग्णसंख्येत कमालीची वाढ होऊ लागली आहे. परिणामी, जीवरक्षक प्रणाली, अतिदक्षता विभाग आणि प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटा मिळेनाशा झाल्या आहेत, तर दुसरीकडे रुग्णवाहिकांची चणचण निर्माण झाली आहे. पालिकेकडे केवळ ४४७ रुग्णवाहिका उपलब्ध असून दैनंदिन रुग्णसंख्या पाहता रुग्णवाहिका कमी पडत आहेत. रुग्णांना रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मुंबईमध्ये गेल्या मार्च महिन्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत गेली. रुग्णांच्या सुविधेसाठी पालिकेने रुग्णालये सज्ज ठेवतानाच करोना काळजी केंद्र, करोना समर्पित आरोग्य केंद्र, जम्बो करोना केंद्र, संस्थात्मक विलगीकरण कक्ष आदींची उभारणी केली. मात्र रुग्णांना तेथे घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. अखेर पालिकेने बेस्ट, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या खासगी बसगाडय़ा ताब्यात घेऊन त्यांचे रूपांतर रुग्णवाहिकेत केले होते. त्यावेळी साधारण ६७५ हून अधिक रुग्णवाहिका करोनाबाधित रुग्णांच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. मात्र करोना संसर्ग नियंत्रणात येऊ लागताच टप्प्याटप्प्याने रुग्णवाहिकांची संख्या कमी करण्यात आली.

फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागला असून पूर्वीपेक्षा अधिक झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णसंख्या प्रतिदिन १० हजाराच्या आसपास पोहोचत आहे. तसेच बाधितांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या आणि कमी जोखमीच्या अशा दोन्ही गटांतील संशयित रुग्णांची संख्याही प्रचंड आहे. बहुसंख्य संशयित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. मात्र हजाराच्या आसपास संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षेत दाखल करण्यात येते. एका रुग्णाला रुग्णवाहिकेतून रुग्णालय अथवा करोना केंद्रात सोडल्यानंतर ती निर्जंतुक करावी लागते. त्यानंतरच दुसऱ्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून घेऊन जाण्यात येते.

करोनाची बाधा झाल्याचा निरोप पालिकेकडून मिळाल्यानंतर रुग्णाला त्याच्या घरून रुग्णवाहिकेने रुग्णालय वा करोना केंद्रात घेऊन जाण्यात येते. परंतु रुग्णवाहिकेसाठी आता रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे जीवरक्षक प्रणाली, अतिदक्षता विभागाची सुविधा, प्राणवायूपाठोपाठ आता रुग्णवाहिकांचा तुटवडाही पालिकेसाठी डोकेदुखी बनण्याच्या मार्गावर आहे.

रुग्णवाहिकांचे गणित

* वाहतूक विभागाने करोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी छोटय़ा बसगाडय़ा, इनोवा आदी ३२३ वाहनांचे रुग्णवाहिकेत रूपांतर केले असून त्या पालिकेला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.

* तसेच १०८ क्रमांकाच्या ४२, पालिकेच्या ४८, बेस्ट बस ३१ एमएसआरटीसीच्या तीन बस अशा एकूण ४४७ रुग्णवाहिका सध्या करोनाबाधितांसाठी धावत आहेत.

* एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात पालिकेकडे केवळ २९१ रुग्णवाहिका होत्या. रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून १० एप्रिल रोजी १५६ रुग्णवाहिका वाढविण्यात आल्या.

* करोनामुळे मृत्यू झालेल्यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी २० शववाहिन्या वाढविण्यात आल्या आहेत.

लसीकरण प्रक्रिया सुरळीत