अमर सदाशिव शैला, लोकसत्ता

मुंबई : राज्यात केशकर्तनालये सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली असली तरी त्यांना कारागिरांची मोठी टंचाई भासत आहे. टाळेबंदीनंतर बहुतांश कारागीर शहर सोडून गेले आहेत. यामुळे आधी चार-पाच खुर्च्या असणाऱ्या सलूनमध्ये सध्या एखाद-दुसरी खुर्चीच असल्याचे चित्र आहे. कारागीरांअभावी सलून चालकांनाच काम करावे लागत आहे.

मुंबईतील बहुतांश नाभिक हे कोकणातील आहेत, तर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ईशान्य भारतीय कारागिरांची संख्याही मोठी आहे. टाळेबंदीनंतर कारागिरांचा रोजगार बुडाल्याने त्यांनी गावी जाणे पसंत केले. आता अटीशर्तीसह केशकर्तनालये सुरू झाली असली तरी त्यांना  कारागिरांचा तुटवडा आहे. मर्यादित रेल्वे गाडय़ा सुरू असल्याने बहुतांश कामगारांना राज्यात परतण्यात अडचणी आहेत. मुंबईतील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कारागिरांमध्ये परत येण्याची भीतीही आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ‘आपले गाव भले’असेच त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर राज्यांतर्गत प्रवासासाठी एसटीची सेवा अद्याप बंदच असल्याने कोकणातील कारागिरांना मुंबई गाठणे शक्य नाही. खासगी गाडय़ा करून मुंबईत येण्यासाठी सुमारे ३ हजार रुपयांची मागणी वाहनचालक करतात. त्यामुळे अनेकांनी गावीच थांबणे पसंत के ले आहे. मुंबईबाहेर ठाणे, कल्याण, वसई, विरार भागातील कारागिरांनाही दुकानांवर पोहचणे जिकिरीचे बनले आहे. प्रवासात करोनाची लागण होण्याची भीती आहे, तर दुचाकीवरून प्रवास करून येताना जागोजागी पोलिसांच्या नाकेबंदीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे दुकानांमध्ये सध्या कारागीर मर्यादित आहेत.

लोअर परळमध्ये ‘यु टक्केज् हेअर अँड ब्युटी सलून’ चालविणाऱ्या राकेश जाधव यांच्याकडे चार कारागीर होते. त्यातील दोघे उत्तर प्रदेश येथील गावी, तर दोघे कोकणात आहेत. कारागिरांअभावी राकेश यांना एकटय़ालाच सलूनचा भार पेलावा लागत आहे. ‘उत्तर प्रदेशातील कारागीर दुकानावरच राहतात. मुंबईत आले तरी या परिस्थितीत दुकानात वास्तव्य करणे धोक्याचे आहे, तसेच त्यांच्या राहण्याची सोय होणेही अवघड आहे. त्यामुळे सध्या हे कामगार येण्यास तयार नाहीत,’ असे जाधव यांनी सांगितले. तर गिरीश भाटिया यांच्या जुहूतील सलूनमध्ये तीन कारागीर काम करतात. यातील दोघे बिहारला गेले आहेत. करोना आटोक्यात आल्यावरच परतू, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एका कारागिरावर दुकान चालविण्याशिवाय गिरीश यांना गत्यंतर नाही. दोन खुर्च्यामध्ये पुरेसे अंतर ठेवणे गरजेचे असल्याने ग्रामीण भागात दुकानांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची संख्या मर्यादित झाली आहे.

७० टक्के कारागीर हे मुंबई बाहेरचे

‘मुंबईत काम करणारे ७० टक्के कारागीर हे मुंबई बाहेरचे आहेत. टाळेबंदीनंतर हे बहुतांश कामगार गावी गेले आहेत. सध्या वाहतुकीच्या साधनांअभावी मुंबईत पोहचण्यात त्यांना अडचणी आहेत. त्यामुळे सद्यस्थिती कारागिरांचा मोठा तुटवडा जाणवत आहे,’ अशी माहिती  ‘ऑल इंडिया हेअर अँड ब्युटी असोसिएशन इंडिया’चे उपाध्यक्ष उदय टक्के यांनी दिली.