प्रवाशांना उभ्यानेच लोकलची प्रतीक्षा करण्याची ‘शिक्षा’

अमर सदाशिव शैला, मुंबई</strong>

मुंबईच नव्हे तर देशातील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे (सीएसएमटी) सुशोभीकरण करण्याची कामे जोरात सुरू असली तरी, या स्थानकातील प्रवासी सुविधा मात्र अजूनही दुर्लक्षित आहेत. पहाटेच्या पहिल्या लोकलपासून मध्यरात्रीनंतरच्या शेवटच्या लोकलपर्यंत सदैव प्रवाशांनी गजबजलेल्या या स्थानकाच्या फलाटांवर प्रवाशांना बसण्यासाठी पुरेसे बाकच उपलब्ध नाहीत. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उभ्यानेच लोकलची वाट पाहावी लागते. याचा सर्वाधिक त्रास वृद्ध नागरिक, अपंग आणि लहान मुलांना होतो.

सीएसएमटी स्थानकातून दर दिवशी लाखो प्रवासी प्रवास करतात. कर्जत, कसारा, पनवेल असा दूरचा प्रवास चाकरमानी सीएसएमटीतून करत असतात. एखादी गाडी सुटली की अनेकदा अर्धा-पाऊण तास पुढच्या गाडीची वाट पाहत ताटकळावे लागते. त्यात अनेक गाडय़ांना विलंब होतो. गाडीकरिता ताटकळण्याबरोबरच फलाटांवर बसायला पुरेसे बाक नसल्याने उभे राहून गाडय़ांची प्रतीक्षा करावी लागते.

सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक पाच व सहावर आणि सातच्या दुसऱ्या बाजूला एकही बाक नाही. तसेच हा संपूर्ण फलाट रिकामा आहे. तर फलाट क्रमांक एक आणि दोन व चार आणि पाचवर एकही बाक नाही. या फलाटांवर दादरकडील बाजूला पुलासाठीचे खांब आहेत. त्याच्या भोवती बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु ते अपुरे आणि लोकलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या डब्याजवळ आहेत. त्यामुळे फारच थोडय़ा प्रवाशांना तिथे बसता येते. याव्यतिरिक्त फलाट क्रमांक दोन व तीनवर तीनच बाक आहेत. गाडय़ांच्या वेळेची सूचना देणाऱ्या फलकाजवळ प्रवासी गाडी कोणत्या फलाटावर लागणार, हे पाहत उभे असतात. या ठिकाणीही प्रवाशांना बसायला बाक नाहीत. तेथे खांबांच्या चारही बाजूला स्टीलचे पाइप लावून बसण्याची सोय केली आहे. मात्र या पाइपवर बसणे गैरसोयीचे होते.

‘गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, महिला, वृद्ध, अपंग नागरिक स्थानकावर गाडीची वाट पाहत असतात. बाक नसल्याने त्यांना नाइलाजाने उभे राहावे लागते. कधी कधी गाडी अर्धा-पाऊण तास उशिरा येते. त्या वेळेस त्यांना तशा अवस्थेत उभेच राहावे लागते. तसेच आम्हीही दिवसभर कार्यालयात काम करतो. घरी जाण्यासाठी गाडी पकडायला स्थानकात येतो. त्या वेळी थकून गेलेलो असतो. गाडी उशिरा येणार असेल तरी बसण्याची सोय नाही. त्यामुळे गाडीची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते, अशी भावना रोहित पाटील या प्रवाशाने व्यक्त केली.

उपनगरीय स्थानकातील जे फलाट मोठे आहेत, तिथे बाकांची सोय आहे. तसेच काही फलाट अरुंद आहेत. तिथे दोन्ही बाजूने गाडय़ा आल्यावर गर्दी होते. त्यात बाक गैरसोयीचे ठरू शकतात. परिणामी या फलाटांवर बाक बसविण्यात आलेले नाहीत.

– ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे