मधुमेह, उच्च रक्तदाबाची महागडी औषधे अनुपलब्ध; रुग्णांची आर्थिक ओढाताण

मुंबई : पालिकेच्या प्रमुख रुग्णालयामध्ये अनेक औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून मुधमेह, रक्तदाब इत्यादी आजारांची महागडी औषधे गेल्या दोन ते तीन महिन्यापांसून रुग्णांना मिळालेली नाहीत. पालिका रुग्णालये आणि मध्यवर्ती खरेदी खात्याच्या(सीपीडी) समन्वयाच्या अभावामुळे औषध कंपन्यांसोबतचा करार सप्टेंबरमध्ये संपूनही नवीन निविदा प्रक्रिया रखडल्या आहेत.

हृदयरोगाच्या रुग्ण सुमती बंगलेकर(६५) यांना मधुमेह असून गेल्या आठ महिन्यांपासून शीव येथील लो. टिळक रुग्णालयात उपचार घेत आहेत. ‘माझे पती निवृत्त आहेत. मुलाने वेगळे घर केले आहे. त्यामुळे निवृत्ती वेतनावरच भागवावे लागते. हृदयरोगाची औषधे महाग असून ती बाहेरूच विकत घ्यावी लागतात. पालिकेतून मिळणाऱ्या मधुमेहाच्या औषधांमुळे थोडा आधार होता. परंतु ती ही औषधे गेल्या दोन महिन्यांपासून बाहेरूनच विकत घ्यावी लागत असल्याने खर्चाचा मेळ बसविताना अजूनच कसरत करावी लागते’, असे सुमती यांनी सांगिकेले.

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये जवळपास १ लाख ३० हजार मधुमेहाचे आणि १ लाख २७ हजार उच्च रक्तदाबाचे रुग्ण उपचार घेतात. दर पंधरा किंवा महिनाभराने ते तपासणीसाठी येतात आणि औषधे घेतात. पॅरासिटामॉलसह आम्लपित्त, कफ ही आवश्यक औषधेही उपलब्ध नाही. जे रुग्ण खूप लांबून येतात. त्यांना महिनाभराची औषधे लिहून देतात. परंतु पुरेसा साठा नसल्याने त्यांना १५ दिवसाची औषधे दिली जातात. मग रुग्णांना परत परत यावे लागते. त्यातही औषधे नसल्याने ते चिडतात आणि याचा राग आमच्यावरही ते काढत असल्याचे नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरने सांगितले.

वैद्यकीय सूची (शेडय़ूल) दोन मधील औषधांचा पुरवठादारांसोबतचा करार सप्टेंबर २०१९ मध्येच संपला आहे. यात जवळपास २०० हून अधिक औषधांचा समावेश आहे. जानेवारी उजाडला तरी पुढील दोन वर्षांच्या निविदा काढण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. खात्याकडे मनुष्यबळापासून सुविधाच उपलब्ध नसल्याने निविदा काढण्यासाठी उशीर झाला आहे. करार संपत असून नवीन निविदा काढण्यास उशीर होत आहे. तेव्हा रुग्णालयांनी स्थानिक औषध वितरकांकडून साठा खरेदी करून ठेवावा अशी सूचना दोन वेळारुग्णालय प्रशासनाला केल्याचे पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालिकेने दोन वर्षांपूर्वी ठरवून दिलेल्या दराने सप्टेंबरपर्यत पुरवठा केला जात होता. परंतु आता पुढेही त्याच दराने पुरवठा करणे परवडणारे नाही. नवीन निविदाही रखडलेल्या आहेत. त्यामुळे पुरवठादारांनी औषध पुरवठा बंद केल्याचे ‘ऑल ड्रग अ‍ॅण्ड लायसन्स होल्डर असोसिएशन’च्या अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

महिन्याचा खर्च दोन हजार रुपये

गोवंडीच्या चामडय़ाच्या कारखानात काम करणारे मोहम्मद मूर्तूजा पालिका रुग्णालयात दर महिन्याला उपचारासाठी येतात. ‘मजुरीवर काम करतो. केसपेपर काढण्यापासून तपास होईपर्यत एक संपूर्ण दिवस जात असल्याने त्या दिवसाची मजुरी बुडते. त्यात गेले दोन महिने मधुमेह आणि उच्च रक्तदाब दोन्हीची औषधे मिळणे बंद झाले आहे. या औषधांसाठी जवळपास दोन हजार रुपये महिन्याला खर्च असून मला परवडणारा नाही. औषधांसाठी गेल्या महिन्यात दोनदा येऊन गेलो. पण मजुरीही नाही आणि औषधेही नाही,’ असे मोहम्मद सांगतात.

निविदा काढलेल्या नसल्या तरी स्थानिक पातळीवर आम्ही औषध खरेदी करतो. पालिकेच्या रुग्णालयात सध्या तरी औषधांचा तुटवडा नाही. परंतु याची अधिक माहिती घेतली जाईल.

– डॉ. रमेश भारमल, संचालक, पालिका रुग्णालय