निर्बंधांमुळे कारागीर अनुपलब्ध; कारागीर मिळाल्यास साहित्यावाचून खोळंबा

नीलेश अडसूळ, लोकसत्ता

iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत बहुतांशी मजुरांनी गाव गाठल्याने घरातील वीज आणि पाण्याशी संबंधित काम करणारे इलेक्ट्रिशियन, प्लंबर मिळेनासे झाले आहेत. त्यातच राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे कारागिरासाठी शोधाशोध करावी लागत आहे. काही ठिकाणी कामगार असूनही हार्डवेअरची दुकाने बंद असल्याने साहित्याच्या उपलब्धतेअभावी कामे रखडली आहेत.

गेल्या आठवडाभरापासून राज्यभर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे घरातच राहून कार्यालयीन कामकाज केले जात आहे. त्यातच उकाडा वाढल्यामुळे पंखा तसेच वातानुकूलित यंत्रांचा वापरही वाढला आहे. त्यासोबतच विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. मात्र, हे बिघाड दुरुस्त करणारे इलेक्ट्रिशियन मिळणे कठीण झाले आहे. हीच बाब नळ दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांबाबत दिसून येत आहे. करोना प्रसार वाढू लागल्यामुळे अनेक कारागीर, तंत्रकर्मी आपापल्या गावी गेल्यामुळेही कुशल कामगारांची टंचाई जाणवत आहे.

‘गेली काही दिवस घरातील गिझर बंद पडला आहे. परंतु तो सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिशियन आणि प्लंबरची वाट पाहावी लागत आहे. सध्या जे काम करत आहेत त्यांच्याकडे कामाचा ताण अधिक असल्याने रोज दिरंगाई होत आहे,’ अशी प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली.

दुकाने बंद

जे कामगार मुंबईत आहेत त्यांच्याकडे कामे असूनही ती करता येत नाहीत अशी परिस्थिती आहे. नागरिक कामावर बोलावतात परंतु हार्डवेअर आणि संबंधित साहित्याची दुकाने बंद असल्याने आवश्यक साहित्य उपलब्ध होत नाही. ‘मोठी कामे मिळणे बंद झाल्याने किरकोळ कामांवर गुजराण सुरू आहे. आमच्याकडे असलेल्या साहित्यात होऊ शकेल अशीच कामे आम्ही करतो आहोत. परंतु मोठे काम असल्यास वायर, कळ किंवा असे साहित्य दुकाने बंद असल्याने खरेदी करता येत नाही,’ असे इलेक्ट्रिशियन संजय भागवत यांनी सांगितले.

चर्मकार, चावीवाले यांचीही चणचण

पादत्राणे दुरुस्त करणारे चर्मकार, बूट पॉलिश करणारे, चावीवाले यांचीही दुकाने बंद आहेत. वास्तविक जीवनावश्यक न वाटणाऱ्या, परंतु वेळेवर न मिळाल्यास दैनंदिन कामातही खोळंबा होईल अशा या सेवा न मिळाल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नव्या वस्तू घेणे शक्य नाही आणि जुन्या वस्तू दुरुस्त करण्यासाठी कामगारही नाहीत अशी स्थिती सध्या आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील दुकानांनाच परवानगी असल्याने चपला दुरुस्ती, चावीवाले यांना रस्त्यावर दुकान लावणे शक्य होत नाही, त्यामुळे या कामगारांचाही अभाव जाणवत आहे.