मुंबई : मुंबई-पुण्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, भ्रमणध्वनी आणि त्याच्याशी संबंधित उपकरणांच्या घाऊक बाजारातून खरेदी करून त्यांची विक्री राज्याच्या कानाकोपऱ्यात करणाऱ्या दुकानदारांकडे या वस्तूंचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. वाहतुकीच्या साधनांअभावी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाइल फोन, सुटे भाग मिळण्यात अडचणी येत आहेत. परिणामी दुकाने सुरू करूनही मालाअभावी त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील मार्केट कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आहे.

सातारा, नाशिक, सांगली जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी मोबाइल आणि संगणक विक्री व दुरुस्तीची दुकाने सुरू झाली आहे. या व्यावसायिकांना सुट्टे भाग मिळविण्यासाठी मुंबई आणि पुण्यातील मोठय़ा बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागते. मोठी गुंतवणूक होत असल्याने मालाची साठवणूक करण्याऐवजी गरजेनुसार हे दुकानदार मालाची मागणी करतात. मात्र महानगरांतील बाजारपेठ सुरू न होण्याचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे. पुण्यातील होलसेल मालाचे व्यापारी चिराग गोस्वामी यांना पुणे, सातारा आणि सांगली भागातील दुकानदारांकडून मालाची मागणी करणारे दरदिवशी १०ते १५ फोन येत असल्याचे ते सांगतात. मात्र टाळेबंदीमुळे हे व्यापारी घराबाहेरच पडू शकत नसल्याने ते हतबलता दर्शवीत आहेत.

सातारा जिल्ह्य़ातील तौफिक शेख याच्या दुकानात वस्तूंची टंचाई आहे. मोबाइलचे डिस्प्ले, चार्जर, सुट्टे भाग यांचा माल मिळत नसल्याने त्याला ग्राहकांना माघारी धाडण्याशिवाय गत्यंतर नाही. तर बाजार उपलब्ध असलेला मालही ३० ते ४० टक्के अधिक किमतीने खरेदी करावा लागत आहे. परिणामी किमती अधिक असल्याने नेहमीच्या ग्राहकांचा रोष पत्करावा लागत असल्याचे तौफिक सांगतो. तर ‘मार्केट बंद असल्याने मोठय़ा नुकसानाला समोरे जावे लागत आहे. होलसेल व्यापाऱ्यांवर दुकान भाडय़ाचा बोजा वाढत आहे. दरदिवशी तीन—चार जणांचे फोन येत असून दुकान कधी चालू करणार अशी विचारणा केली जाते,’ असे मुंबईच्या मनीष मार्केटमधील व्यापारी स्वताराम माली सांगतात.

तरीही अडचणी

‘इथला बाजार सुरू होईपर्यंत आम्ही माल पोहचवू शकणार नाही. सध्या ईमेल आणि फोनवरून ऑर्डर स्वीकारत आहोत. माल ५ जूननंतर पाठवणे शक्य झाले तरी कामगारांची आणि वाहतुकीच्या साधनांची उपलब्धता कमी झाल्याने माल पाठविण्यात अडचणी आहेच. त्यातून मालाच्या किमती वाढतील, असे ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष नितेश मोदी यांनी सांगितले.