09 July 2020

News Flash

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची बाजारात टंचाई

किमती वाढलेल्या असतानाही ग्राहकांकडून खरेदी; लॅपटॉप, राऊटर, वेबकॅम यांना सर्वाधिक मागणी

किमती वाढलेल्या असतानाही ग्राहकांकडून खरेदी; लॅपटॉप, राऊटर, वेबकॅम यांना सर्वाधिक मागणी

मुंबई : घरातूनच काम करण्याची गरज, ऑनलाइन शिक्षण यांमुळे सध्या लॅपटॉप, राऊटर, वेबकॅम यांसारख्या उपकरणांना सध्या मोठी मागणी असून त्यांच्या किमतीही वाढलेल्या आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने या वस्तूंची टंचाई बाजारात जाणवू लागली असून ग्राहकांना नामांकित ब्रँडऐवजी दुय्यम कंपनीच्या किंवा निम्न दर्जाच्या वस्तूंवर समाधान मानावे लागत आहे.

लॅपटॉप, वेबकॅमबरोबर इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी उच्च प्रतीचे राऊटर, मनोरंजनासाठीही हेडफोन हेही खरेदी केले जात आहेत. एकाएकी वाढलेल्या मागणीमुळे त्यांचा पुरवठा करणे विक्रेत्यांना मुश्कील झाले आहे. बाजारात माल नाही. शिवाय चीनमधील बाजारातून माल येण्यास अडथळे आहेत. त्यामुळे हा तुटवडा जाणवत असल्याचे व्यापारी सांगतात. नामांकित कंपन्यांची उत्पादने खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, या वस्तू आवश्यक असल्याने अनेक ग्राहक मिळेल त्या कंपनीचे उत्पादन खरेदी करत आहेत. परिणामी अडगळीत पडलेल्या वेबकॅमनाही आता अचानक मागणी होत असल्याचे व्यापारी सांगतात.

मोठय़ा ब्रँडची साखळी दुकाने असलेल्या अनेक शोरूममध्ये लॅपटॉप शिल्लक नसल्याचे तेथील कर्मचारी सांगतात. लॅपटॉपचा साठा नसल्याने ग्राहकांना माघारी पाठवावे लागत आहे, असे चेंबूरच्या ‘कोहिनूर’चे  व्यवस्थापक मनोज सिंग यांनी सांगितले. आमच्या मॉलमध्ये असलेल्या शाखा सध्या बंद असल्याने तो माल इथे विक्रीला काढल्याचे क्रोमाचे प्रतिनिधी सांगतात. टाळेबंदीआधी दर महिन्याला ७० ते ८० लॅपटॉप विक्री करत असू. सध्या १५० ते १७५ लॅपटॉपची विक्री होत होती. आता मात्र मालाचा तुटवडा जाणवत असून ग्राहकांनी मागणी केलेल्या ‘मॉडेल’च्या वस्तू पुरवणे शक्य नसल्याचे ‘पीसी गाइड’ या दुकानाचे मालक विनोद निसार यांनी सांगितले. ‘जगभरातच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मागणी वाढली आहे. त्या प्रमाणात कंपन्यांकडून पुरवठा कमी आहे. स्वस्त व नामांकित मॉडेलच्या वस्तूंना मागणी आहे. त्यामुळे त्यांची लागलीच विक्री होते,’ अशी माहिती ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे रिषभ शहा यांनी दिली.

जुन्या लॅपटॉपना मागणी

नवीन लॅपटॉप परवडत नसल्याने जुने लॅपटॉप खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल आहे. त्यातून त्यांची मागणी वाढली आहे, असे ग्रँट रोड येथील व्यापारी सांगतात. त्याचबरोबर पुरेसा पुरवठा नसल्याने ग्रामीण भागात जुन्या लॅपटॉपच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. साधारणत: १६ हजार रुपयांना मिळणारा हा लॅपटॉप १८ हजारांना विकला जात आहे. त्याचबरोबर भाडय़ाने दिलेले जुने लॅपटॉप परत मिळाल्यावर दुकानदार त्यांची थेट विक्री करून मोकळे होत आहेत.

किमतीत वाढ

तुटवडा असलेल्या अनेक गॅझेटच्या किमतीत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशालाही कात्री बसत आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने अन्यत्र माल पाठविताना व्यापाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 4:21 am

Web Title: shortage of electronics equipment in the market zws 70
Next Stories
1 ‘क्यूआर कोड’द्वारे प्रवास भाडे
2 बेस्टमधील ३० कर्मचारी बडतर्फ
3 पालिकेच्या दवाखान्यात प्रतिजन चाचणी
Just Now!
X