News Flash

प्रवाशांची फरफट दुर्लक्षितच

उपनगरांतील परिवहन सेवांमुळे मुंबईचा प्रवास खडतर; बेस्ट, एसटीवर ताण

उपनगरांतील परिवहन सेवांमुळे मुंबईचा प्रवास खडतर; बेस्ट, एसटीवर ताण

मुंबई, ठाणे, वसई : मुंबई लगतच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदर परिवहन सेवांनी दुर्लक्ष केल्याने तेथून मुंबईकडे येणाऱ्या नोकरदारांची अक्षरश: फरफट होत आहे. या वाढत्या प्रवासी संख्येपुढे एसटी आणि बेस्ट सेवाही अपुरी पडत असल्याने गर्दीत प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त खासगी कार्यालय कर्मचारी आणि अन्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा रोड-भाईंदर, ठाणे, पनवेल, बदलापूरसह अन्य भागांतून मुंबईकडे कामानिमित्त येणाऱ्यांनी खासगी वाहतुकीचा महागडा पर्याय निवडला, मात्र खिसा कापला जात असल्याने उपनगरांतील नोकरदारवर्गाने एसटी आणि बेस्टकडे धाव घेतली आहे. परंतु वाढती गर्दी आणि मर्यादित बेस्ट बस- एसटी गाडय़ांमुळे त्यांना तासन्तास रांगेत तिष्ठावे लागते आणि नंतर बसच्या गर्दीत गुदमरत प्रवास करावा लागतो. नोकरदारांचा मुंबईपर्यंतचा प्रवास खडतर आणि आठ ते नऊ तांस असा वेळखाऊ ठरत आहे.

एसटी आणि बेस्टच्या प्रवासासाठीही नोकरदारांना महिन्याकाठी तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात. स्थानिक परिवहन सेवांची एसटी, बेस्टला जोड मिळाली तर गर्दीतला प्रवास दिलासादायक ठरू शकतो. परंतु स्थानिक परिवहन सेवांनी प्रवाशांकडे दुर्लक्ष केले आहे.

एसटी महामंडळातर्फे सध्या शहापूर, बदलापूर, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, ठाणे,कळवा, येथून मुंबईच्या वेशीवर आणि मुंबईपर्यंत जाण्यासाठी दररोज ३६३ एसटी फे ऱ्या चालवल्या जातात. त्यांत कल्याण-डोंबिवली येथून एसटीच्या सुमारे १९२ फे ऱ्या, ठाणे-कळवा येथून ४४ पेक्षा जास्त फे ऱ्या सोडल्या जातात. याशिवाय नालासोपारा, वसई-विरार, पालघरमधूनही ४२२ पेक्षा जास्त फे ऱ्या होत आहेत. येथून दररोज ‘एसटी’ने प्रवास करणारे १७ ते १८ हजार प्रवासी आहेत. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने आणखी २४० फे ऱ्या सुरू केल्या. ‘एसटी’बरोबरच ‘बेस्ट’नेही टाळेबंदीत कल्याण-डोंबिवली, बदलापूर, ठाणे, पनवेल येथून मुंबईसाठी विशेष गाडय़ा चालवल्या. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू होताच आणि मुंबईतील प्रवासीसंख्येत वाढ होताच त्यांनी त्या बंद करून मुंबईपुरत्याच मर्यादित ठेवल्या आणि जास्तीत जास्त प्रवाशांना मुंबईतच बस उपलब्ध करण्याचा प्रयत्न के ला.

वसई-विरारच्या परिवहन सेवा ठप्प

वसई- विरार आणि मीरा भाईंदरमधून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नोकरदारांचे करोना काळात हाल सुरू आहेत. त्यांना स्थानिक पालिकांच्या परिवहन सेवेचा आधार वाटत होता. परंतु दोन्ही महापालिकांच्या परिवहन सेवा ठेकेदारामार्फत चालविण्यात येत होत्या. ठेकेदाराने आर्थिक कारण देऊन पाच महिन्यांपासून सेवा बंद ठेवल्याने तेथील नागरिकांचा मुंबईशी संपर्क तुटला आहे.

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा २०१२ पासून ‘मेसर्स भगिरथी ट्रान्सपोर्ट’ या खासगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. सध्या पालिकेच्या ताफ्यात १६० बस आहेत. त्यापैकी १३० बस ठेकेदाराच्या आहेत. पालिकेची बससेवा ४३ मार्गावर चालते. परंतु करोना संकटामुळे ही सेवा बंद आहे. संकट काळातही बेस्ट आणि एसटी सेवा सुरू होत्या. मात्र परिवहन ठेकेदाराची एकही बस रस्त्यावर नव्हती. पालिकेने वारंवार ठेकेदाराला विनंती केली. मात्र त्याने आर्थिक टंचाईचे कारण देत सेवा सुरू करण्यास नकार दिला. त्यामुळे पालिकेने त्याचा ठेका रद्द करून नवीन ठेकेदार नियुक्त करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. याच ठेकेदारामार्फत मीरा-भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा चालवली जात होती. हजारो प्रवासी परिवहन सेवेच्या बसनेही मुंबईकडे ये-जा करत होते. परंतु इथेही ठेकेदाराने नकार दिल्याने येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे. ठेकेदाराच्या मनमानीला कंटाळून पालिकेने ३५ मार्गावर स्वत: बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना टाळेबंदीपूर्वी ठाणे परिवहन सेवेच्या ठाणे ते मंत्रालय या मार्गावर १, ठाणे ते नालासोपारा मार्गावर १०, ठाणे ते अंधेरी मार्गावर ४, ठाणे ते बीकेसी मार्गावर ४, ठाणे ते मुलुंड मार्गावर २५, ठाणे ते बोरिवली मार्गावर २० आणि ठाणे ते बोरिवली मार्गावर २५ वातानुकूलित अशा ८९ बस दररोज सोडण्यात येत होत्या. टाळेबंदीमुळे सार्वजानिक वाहतुकीवरही निर्बंध आले. परंतु, टाळेबंदी शिथिल केल्यानंतर नोकरदारांसाठी ठाणे परिवहन सेवेने काही विशेष बस सेवा सुरू केल्या आहेत. परंतु वाढत्या प्रवासी संख्येमुळे त्याही अपुऱ्या पडत आहेत.

करोना संकटापूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेची एकही गाडी मुंबईकडे धावत नव्हती. मात्र, करोना टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात लोकल सेवा बंद असल्यामुळे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी कल्याण ते विक्रोळी या मार्गावर दोन बस सोडण्यात येत होत्या. सध्याही या गाडय़ांच्या फेऱ्या सुरू असून येत्या काळात राज्य शासनाने कल्याणहून मुंबईकडे गाडय़ा सोडण्याच्या सूचना दिल्यास त्याप्रमाणे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती कल्याण- डोंबिवली परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सध्या एसटीच्या गाडय़ा बेस्ट उपक्र माला दिल्या आहेत. बेस्टची एक हजार गाडय़ांची मागणी आहे. हळूहळू ती पूर्ण के ली जाईल. त्यासाठी मुंबईबाहेरून गाडय़ा आणल्या जातील. 

शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

बेस्टच्या ताफ्यात १०० एसटी दाखल झाल्या आहेत. एसटी बेस्टसाठी आणखी एक हजार गाडय़ा देणार आहे. गरज पडल्यास बेस्टच्या मार्गावरही एसटी चालवण्याचा विचार के ला जाईल.

अनिल पाटणकर, अध्यक्ष, बेस्ट समिती

टीएमटीही अपुरीच

’सध्या ठाणे परिवहन सेवेच्या ठाणे ते बोरिवली मार्गावर दोन वातानुकू लित, तर १३ साध्या बस धावत आहेत.

’ठाणे ते नालासोपारा मार्गावर १० आणि ठाणे ते मुलुंड चेकनाका मार्गावर १० अशा ३५ गाडय़ा चालवण्यात येत आहेत.

’ त्या अत्यंत अपुऱ्या ठरत असल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत. दरम्यान, ठाणे परिवहन सेवेच्या गाडय़ांतून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली.

’या मार्गावर बसची संख्या वाढविण्यात येईल, अशी भूमिका ठाणे परिवहन प्रशासनाने घेतली आहे.

..म्हणून थोडा दिलासा

मुंबईत किंवा मुंबईच्या वेशीपर्यंत येण्यासाठी उपनगरांत राहणाऱ्या नोकरदारवर्गाचे प्रवासहाल होत आहेत. ते कमी करण्यासाठी स्थानिक पालिकांच्या परिवहन सेवांनी पर्याय शोधलेला नाही. उलट एसटी महामंडळाने बेस्टसाठी मुंबई महानगर प्रदेशात आणखी एक हजार बसगाडय़ा चालवण्याचे नियोजन के ले आहे. एसटी-बेस्टमुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 3:01 am

Web Title: shortage of public transport troubles daily commuters living in mumbai suburban zws 70
Next Stories
1 गंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचार फायदेशीर नाही
2 पालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू
3 Coronavirus : मुंबईत २४ तासांत २,२८२ रुग्ण
Just Now!
X