News Flash

बाजारपेठांमध्ये भाज्यांचा तुटवडा

 दादर, भायखळा येथील मुख्य भाजी बाजारात मुंबईतील किरकोळ भाजी विक्रेते भाजी खरेदीसाठी येतात.

चार ते पाच रुपयांनी भाववाढ; पालेभाज्यांची कमतरता

मुंबई : पावसामुळे दोन दिवस ओस पडलेले भाजी बाजार बुधवारी गजबजले परंतु वादळ आणि पावसामुळे आणि शेतमालाचे नुकसान झाल्यामुळे भाज्या पुरेशा प्रमाणात मुंबईतील बाजारपेठांमध्ये पोहचू शकल्या नाहीत. भाज्यांचा तुटवडा झाल्याने प्रत्येक भाजीच्या दरात किलोमागे चार ते पाच रुपये भाव वाढले होते.

सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झालेल्या भाज्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी खरेदी केल्या. परंतु सकाळपासून पावसाने वेग धरल्याने ग्राहक आणि किरकोळ विक्रेते मुख्य बाजारपेठांमध्ये फारसे फिरकले नाहीत. त्यामुळे उर्वरित माल व्यापाऱ्यांनी मंगळवारी विकला. हीच स्थिती स्थानिक बाजारपेठांमधील भाजी विक्रेत्यांची होती. त्यामुळे बुधवारी घाऊक व्यापारी आणि किरकोळ विक्रेते या दोन्ही स्तरांवर मोठय़ा प्रमाणात भाज्यांची मागणी होती. परंतु शेतमालाला वादळाचा फटका बसल्याने पुरेशा प्रमाणात भाज्या उपलब्ध झाल्या नाहीत. पालेभाज्यांची आवक खूपच कमी प्रमाणात झाल्याचे दिसत होते.

दादर, भायखळा येथील मुख्य भाजी बाजारात मुंबईतील किरकोळ भाजी विक्रेते भाजी खरेदीसाठी येतात. परंतु मुख्य बाजारातच पुरेशा भाज्या नसल्याने या विक्रेत्यांना निराशेने परतावे लागले. ‘दादर आणि भायखळा येथील मुख्य बाजारात वाशी येथून भाज्या येतात. परंतु बुधवारी वाशीच्या एपीएमसी बाजारातच आवक कमी झाल्याने आम्हालाही खरेदी करता आली नाही,’ असे दादर येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

स्थानिक बाजाराची स्थिती

याचा परिणाम स्थानिक बाजारांतील भाजीविक्रेत्यांवर झाला. अनेक विक्रेत्यांकडे हव्या त्या भाज्या न मिळाल्याने ग्राहक परतत होते. शिवाय र्निबधकाळात एकावेळी अधिक भाजी खरेदी करून साठवून ठेवण्याकडे ग्राहकांचा कल आहे. मात्र, पुरेशा भाज्या न मिळाल्याने अनेकांना गुरुवारी पुन्हा बाजारात यावे लागणार असल्याची खंत होती. काही विक्रेत्यांकडे पावसात भिजलेल्या, दोन दिवस साठवलेल्या भाज्या ग्राहकांना खरेदी कराव्या लागत होत्या. ज्यांच्याकडे ताज्या भाज्या उपलब्ध होत्या, त्यांचेकडे दर जास्त होते. मेथी, शेपू या पालेभाज्या क्वचितच विक्रीस दिसत होत्या.

व्यापाऱ्यांचे म्हणणे.

फळभाज्यांच्या तुलनेने पालेभाज्यांचा विशेष तुटवडा होता. बदलत्या हवामानाचा परिणाम झाल्याने भेंडी, शिमला मिरची, लिंबू यांचाही पोत काहीसा ढासळला होता. भाज्या कमी आल्याने दोन ते चार रुपयांनी दरवाढ झाली. दोन दिवस वादळाच्या गोंधळामुळे बाजारावर परिणाम झाला होता. बुधवारी बाजार सुरळीत होईल असे वाटले होते. त्यानुसार मागणीही वाढली होती, परंतु शेतमाल अपुरा पडला, असे भायखळा येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 2:05 am

Web Title: shortage of vegetables in the markets ssh 93
Next Stories
1 साचलेल्या पाण्यामुळे ‘लेप्टो’चा धोका
2 सायबर भामटय़ाकडून जवानाची फसवणूक
3 २६ जणांना जलसमाधी
Just Now!
X