पावसाळा सुरू झाला की चिखल, खड्डेमय रस्ते, चिकचिकाट हे सगळं ओघाने आलंच. विण्डचीटर, रेनकोट, छत्रीची कितीही आवरणे घेतली, तरी ऑफिसपर्यंत पोहोचेस्तोवर ओलंचिंब होणं काही चुकत नाही. त्यात लॅपटॉप, महत्त्वाच्या फाइल्स सांभाळणं ही कसरत असतेच. बाइकने ऑफिस गाठायचं म्हटलं की खड्डय़ांमुळे पँटवर चिखलनक्षी उमटलेली असते. मग त्याच अवतारात ऑफिसला जावं लागतं. दिवसभर त्या चिकचिकाटापासून सुटका नसते. संध्याकाळी पँट थोडी सुकल्याचे समाधान मिळेपर्यंत घरी परतायची वेळ झालेली असते. त्यामुळे पुन्हा पाढे पंचावन्न. अशा वेळी मुलांना ऑफिस कल्चरचा भाग असलेली ट्राउझर नकोशी वाटू लागते. डेनिम पाण्यात भिजल्यावर तिचं वजन पेलताना नाकीनऊ  येतात. त्यामुळे पावसाळ्यासाठी खास कॉटन, डेनिमच्या शॉर्ट पँट्स बाजारात दाखल झाल्या आहेत.

पावसाळ्यात मुलींसाठी बाजारात कपडय़ांचे विविध पर्याय सहज पाहायला मिळतात. पण मुलांसाठी विशेषत: पँट्समध्ये काहीच पर्याय नसतात. पण यंदाचं वर्ष त्याला अपवाद ठरलं आहे. सुटसुटीत, आरामदायी ठरणाऱ्या कॉटन, डेनिम शॉर्ट पँट्स, बर्मुडा पँट्सनी मुलांच्या वॉर्डरोबमध्ये जागा पटकावली आहे. या शॉर्ट पँट्स पूर्वी नव्हत्या, अशी बाब नाही. पण कॉलेजमधून त्या हद्दपार होत्या मग ऑफिसमध्ये शॉर्ट पँट्स, केप्रीज घालण्याचा प्रश्नच येत नाही. पण सध्या बऱ्याच स्टार्टअप कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, खाजगी कंपन्यांमध्ये त्यांच्या कामाचं स्वरूप लक्षात घेता ऑफिसेसमध्ये पावसाळ्यात या शॉर्ट पँट्स, केप्रीज, बर्मुडाज वापरण्याची सवलत मिळू लागली आहे. अर्थात काही महत्त्वाच्या मिटिंग, प्रेझेंटेशन, क्लायंट विझिटच्या वेळी फॉर्मल लुकच पसंत केला जातो. पण त्याखेरीज रोज ऑफिससाठी, फिरतीची काम करताना या पँट्स सुटसुटीत आणि आरामदायी ठरू लागल्या आहेत.

प्रिंटेड कॉटन शॉर्ट पँट्स

मागच्या सीझनमध्ये कॉटन प्रिंटेड शॉर्ट पँट्स ट्रेंडमध्ये आल्या होत्या. केवळ तरुणाईमध्येच नाही तर सेलेब्रिटीजमध्येही या पँट्स बऱ्याच पसंत केल्या जातात. छोटे फ्लोरल, भौमितिक प्रिंट्स या पँट्सवर पाहायला मिळतात. ऑफिससाठी साधारणपणे पेस्टल किंवा अर्थी टोन्समधील पँट्स पसंत केल्या जातात. फॉर्मल प्लेन शर्ट्स या पँट्ससोबत सुंदर दिसतात. कॅरी करायला सोप्प्या आणि दिसायला आकर्षक या पँट्स ऑफिसमध्येही सर्रास वापरल्या जातात.

ऑफिसमध्ये शॉर्ट कॅरी करताना घ्यायची काळजी :

  • फंकी प्रिंट्स, लाउड रंग, बॅगी पँट्स ऑफिसमध्ये वापरू नका. बेसिक, अर्थी टोन्स, प्रिंट्स ऑफिससाठी वापरा. तुमच्या पँट्स आणि शर्ट्स चांगल्या प्रतीचे असू द्यात. ऑफिसवेअरची खरेदी करताना स्ट्रीट शॉपिंग करणं टाळा.
  • पँटची लांबी गुडघ्यापर्यंत हवी. अति आखूड आणि अति लांब पँट फॉर्मलवेअरमध्ये शोभून दिसत नाही.
  • हाफ स्लीव्हचे स्ट्रेट फिटचे शर्ट तुम्ही या पँट्ससोबत वापरू शकता. लाँग शर्ट असल्यास टक-इन करायला विसरू नका.
  • या पँट्स बहुतेकदा कॅज्युअल लुक देतात. त्यामुळे तुमचा लुक फारसा अ‍ॅक्सेसराइज करू नका. छान बेल्ट, घडय़ाळ इतकी अ‍ॅक्सेसरी पुरेशी आहे.
  • शूज सेमी-फॉर्मल असू द्यात.
  • शक्यतो ऑफिसमध्ये टी-शर्ट्स वापरू नका. वापरायचे असल्यास कॉलर, प्लेन रंगांचे टी-शर्ट वापरा.

डेनिम शॉर्ट पँट्स

पावसाळ्यात पाण्यात भिजून जड झालेली जीन्स पूर्ण दिवस घालणं नकोशी वाटू लागते. पण त्याला पर्याय म्हणून डेनिम शॉर्ट पँट्स बाजारात आल्या आहेत. सेमी फॉर्मल लुकसाठी या पँट्स सहज वापरता येतात.

बर्मुडा शॉर्ट पँट्स

आतापर्यंत बीचवेअर किंवा फिरायला जाताना वापरल्या जाणाऱ्या बर्मुडा पँट्स आता ऑफिस कल्चरचा भाग बनू लागल्या आहेत. गुडघ्यापर्यंतच्या उंचीच्या, स्ट्रेट फिट आणि विविध रंगांत उपलब्ध असलेल्या बर्मुडा ऑफिसमध्ये वापरल्या जाऊ  लागल्या आहेत. केप्रीप्रमाणे बर्मुडाला अति पॉकेट्समुळे येणारा बॅगीपणा नसतो. त्यामुळे त्या ढगाळ दिसत नाहीत.

शॉर्ट पँट्स ऑफिस कल्चरचा भाग झाल्या असल्या, तरी सेमी फॉर्मल ड्रेसिंगचे नियम त्यांना लागू आहेतच. इस्त्रीच्या, योग्य प्रिंट्स, रंगांच्या पँट्सच वापरायला ऑफिसेसमध्ये परवानगी दिली जाते. त्यामुळे तुम्ही त्या कशा कॅरी करता हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

कुठे मिळणार?मुंबईच्या अनेक ब्रँडेड दुकानांमध्ये शॉर्ट्सचं कलेक्शन आलं आहे. अंधेरी, मलाड, गोरेगाव, घाटकोपर येथील मॉलमधील पँटलुन, वेस्टसाइट, सेन्ट्रलमध्ये ही कलेक्शन्स पाहायला मिळतील. यांच्या किमती साधारणपणे ८०० रुपयांपासून सुरू होतात.