राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयांसह मुंबई व नवी मुंबईतील २५ अभियांत्रिकी महाविद्यालयांची नावे २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या मान्यता यादीतून ‘अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) वगळली आहेत. या महाविद्यालयांवर ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली आहे. अनेक त्रुटी असूनही विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या या महाविद्यालयांना ‘एआयसीटीई’च्या या कारवाईमुळे चाप बसला आहे.
‘एआयसीटीई’ने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या चालू शैक्षणिक वर्षांतील मान्यताप्राप्त अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांच्या यादीतून महाराष्ट्रातील २५ महाविद्यालये वगळण्यात आली आहेत. ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष मंथा यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे, मात्र गुरुवारी १९ जून रोजी या महाविद्यालयांच्या होणाऱ्या सुनावणीनंतर त्यांना मान्यता देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही गेलो असल्याचे मंथा यांनी स्पष्ट केले.
एआयसीटीईने या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना त्यांच्या त्रुटींसंदर्भात गुरुवापर्यंत बाजू मांडायला सांगितले असले तरी पुरेशी जागा नसण्यासह अनेक गंभीर स्वरूपाच्या त्रुटी या वर्षी दूर होणे शक्य नसल्याने त्यांच्यावर कारवाई अटळ आहे, असे तंत्रशिक्षण संचालनालयातीलच एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ९ मे २०१४ च्या आदेशानुसार संपूर्ण महाविद्यालयांना मान्यता देण्याचे अधिकार एआयसीटीईला १० जूनपर्यंतच होते. त्यामुळे आता कोणत्याही महाविद्यालयाला मान्यता यादीत समाविष्ट करणे शक्य होणार नाही.
बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालये ही शिक्षणसम्राटांची असून आवश्यक अटी व शर्तीची पूर्तता या महाविद्यालयांनी वर्षांनुवर्षे पूर्ण केली नसल्याचे ‘सिटिझन फोरम’ या संस्थेचे म्हणणे आहे. या संस्थेच्या समीर नानीवडेकर, प्रा. वैभव नगरवडे, प्रा. शेजवलकर तसेच संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळेच या महाविद्यालयांवर कारवाई होऊ शकली. दरम्यान, यापैकी काही महाविद्यालयांनी येत्या शैक्षणिक वर्षांचे प्रवेश पत्रक छापून विकण्यासही सुरुवात केली आहे.

नावे वगळलेली काही अभियांत्रिकी महाविद्यालये
राजेश टोपे यांचे मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे जालना येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, शरद पवार यांच्याशी संबंधित कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, शीव येथील वसंतदादा पाटील महाविद्यालय, वरळीचे वाटुमल महाविद्यालय, एसएनडीटीचे उषा मित्तल महाविद्यालय, ऐरोली येथील दत्ता मेघे महाविद्यालय, नवी मुंबईतील इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, खारघरचे सरस्वती महाविद्यालय, नवीन पनवेल येथील पिल्लई महाविद्यालय, नेरुळचे एसआईएस महाविद्यालय, खारघरचे अण्णासाहेब चुडामण महाविद्यालय, नवी मुंबईचे लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालय, कामोठेचे एमजीएम कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग आणि ठाणे येथील केसी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग.

कारवाईची कारणे
आवश्यक जमीन नाही, एकाच जागेवर अनेक शैक्षणिक संस्था, अपुरी प्राध्यापक संख्या, प्रयोगशाळांचा अभाव आदी.