11 December 2017

News Flash

वर्षभरापूर्वीच कामगार विभागात नोकरीला लागलेल्या श्रद्धा वरपेचा चेंगराचेंगरीत मृत्यू

वडिलही कामगार कल्याण विभागात कार्यरत

मुंबई | Updated: September 29, 2017 9:05 PM

कामगार कल्याण विभागात काम करणारी श्रद्धा वरपे ही वर्षभरापूर्वीच कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झाली होती.

विश्वास पुरोहित/ मधुरा नेरुरकर

एल्फिन्स्टन- परळ पुलावरील चेंगराचेंगरीत कामगार कल्याण विभागात काम करणाऱ्या श्रद्धा वरपे आणि मीना वालेकर या दोघींचा मृत्यू झाला. श्रद्धा वरपेचे वडीलही कामगार विभागात कामाला असून ते देखील दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळीच होते. मात्र ते या दुर्घटनेतून बचावले आहेत.

एल्फिन्स्टनमधील कामगार कल्याण विभागात काम करणारी श्रद्धा वरपे (वय २३) ही वर्षभरापूर्वीच कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झाली होती. तर मीना वालेकर या कामगार कल्याण विभागात लेखा शाखा अधीक्षक पदावर कार्यरत होत्या. शुक्रवारी सकाळी श्रद्धा आणि मीना या दोघी ऑफिसला जाण्यासाठी स्टेशनवर आल्या. मात्र या दोघी गर्दीत अडकल्या आणि यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीतच त्यांचा मृत्यू झाला. श्रद्धा आणि मीना यांच्यासोबत आणखी चार महिला कर्मचारी होत्या. मात्र त्या पुढे निघून गेल्याने त्या दुर्घटनेतून बचावल्या. श्रद्धाचे वडील किशोर वरपे हे देखील कामगार विभागात असून दुर्घटनेच्या वेळी ते तिथेच होते. माझ्या डोळ्यांदेखत मुलीचा मृत्यू झाला, मी काहीच करु शकलो नाही, असे त्यांनी सांगितले. मुलीच्या मृत्यूमुळे किशोर वरपे आणि कुटुंबाला धक्का बसला असून मुलीच्या आठवणीने किशोर यांना रडू आवरता येत नव्हते.

कामगार विभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच कर्मचारी केईएम रुग्णालयात पोहोचले. श्रद्धा कल्याण पूर्वेतील खडेगोळीवलीत राहत. तिच्या मृत्यूचे वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली होती. श्रद्धाच्या निधनाचे फलकही परिसरात लागले आहेत. मीना वालेकर या उल्हासनगरला राहत होत्या.

vishwas.purohit@loksatta.com

madhura.nerurkar@loksatta.com

First Published on September 29, 2017 8:59 pm

Web Title: shraddha varpe kalyan meena valekar working in maharashtra labour welfare board died elphinstone station stampede