अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीतून काय साध्य होणार या अत्यंत वैचारिक विषयापासून ते थेट जाहिराती आम्हाला का आवडतात, अशा हलक्याफुलक्या विषयापर्यंत विविध विषयांवर महाविद्यालयातील तरुण वक्ते व्यक्त होत होते आणि दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात श्रोते या वक्त्यांच्या विचारांना आणि त्या विचारांच्या मांडणीला उत्स्फूर्त दाद देत होते. निमित्त होते नाथे समूह प्रस्तूत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता’ वक्तृत्त्व स्पर्धेच्या मुंबई विभागाच्या अंतिम फेरीचे! मुंबईतील प्राथमिक फेरीमधून निवडलेल्या सात वक्त्यांमधून डी. जी. रुपारेल महाविद्यालयाच्या श्रेयस मेहेंदळे याची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर आणि नाटककार व लेखक प्रशांत दळवी यांनी परीक्षकाचे काम सांभाळले. जनकल्याण सहकारी बँक आणि तन्वी हर्बल यांच्या मदतीने ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीतील ३६ स्पर्धकांमधून निवडलेल्या सात स्पर्धकांची विभागीय अंतिम फेरी मंगळवारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहात पार पडली. साठय़े महाविद्यालयाच्या प्रणव पटवर्धनच्या भाषणापासून स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेत संजय दाभोळकर याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासह इतर पारितोषिके इंडियन एक्सप्रेसचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेण्ट केव्हीन सँटोस, तरुणकुमार तिवाडी, जनकल्याण सहकारी बँकेचे मिलिंद देसाई आणि तन्वी हर्बलच्या डॉ. मेधा मेहेंदळे आणि लोकसत्ताचे रवींद्र पाथरे यांच्या हस्ते देण्यात आली. आता १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत श्रेयस मेहेंदळे मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहे.     

श्रेयस मेहेंदळे याने ‘संवाद, माध्यमं आणि आम्ही’ या विषयावर भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच तरुणांच्या व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याच्या व्यसनावर मार्मिक विनोद करत त्याने संवादासाठी माध्यमांची आवश्यकता यावर उत्तम भाष्य केले.
*******
द्वितीय पारितोषिक मिळवणाऱ्या रूईया महाविद्यालयाच्या प्रियांका तुपे हिने ‘मराठी अभिजात झाली, मग?’ या विषयाची मांडणी करताना राजकीय अस्मिता, मराठी भाषकांची भाषेबद्दलची अनास्था आदी अनेक मुद्दय़ांना स्पर्श केला.
*******
‘भारतीय पुराणातील वानगी’ हा विषय मांडणाऱ्या रुपारेल महाविद्यालयाच्या गौरी केळकर हिला तृतीय पारितोषिक मिळाले. तर, साठय़े महाविद्यालयाच्या वेदवती चिपळूणकरने ‘आम्हाला जाहिराती आवडतात, कारण..’ हा विषय भाषणातून मांडला. तिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

विनामूल्य प्रवेशिका
विभागीय अंतिम फेरी
ठाणे
दि.  ४ फेब्रुवारी २०१५
वेळ : संध्याकाळी ५.३० वाजता
स्थळ :  शेठ एनकेटीटी कॉलेज सभागृह, सीकेपी हॉलजवळ, खारकर आळी, ठाणे (पश्चिम).