News Flash

श्रेयाचा मृतदेह आढळला

चार वर्षांच्या श्रेया मेश्राम या चिमुरडीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडले

श्रेया मेश्राम

एकीकडे शिवाजीनगर, मानखुर्द येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचा शोध लावण्यात अपयश येत असतानाच पवईतून पळवून नेलेल्या चार वर्षांच्या श्रेया मेश्राम या चिमुरडीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडले. रविवारी रात्री अंगणातून पळविलेल्या श्रेयाचा मृतदेह बुधवारी दुपारी तुंगा गावापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आढळून आला. श्रेयाची हत्या करण्याआधी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचाही प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून तिच्या मारेकऱ्याला पकडण्याचे आव्हान मुंबई पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
पवईच्या तुंगा गावात आपल्या आजी-आजोबांसोबत राहणारी चार वर्षांची श्रेया रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास एकाएकी गायब झाली होती. पवई पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पवईचा पूर्ण परिसर पिंजून काढला होता. चार पथकांची निर्मिती करत तिच्या शोधात असतानाच बुधवारी सकाळी पवईतील साकीविहार मार्गावरील कृष्णा बिझनेस पार्कजवळील झाडीत एका लहान मुलीचा कुजलेला विवस्त्र मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली तेव्हा तो मृतदेह बेपत्ता असलेल्या श्रेयाचाच असल्याचे स्पष्ट झाले. हत्या करण्याआधी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. पवई पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) विनायक देशमुख यांनी दिली. श्रेयाला पळविल्यानंतर अवघ्या काही तासांत तिची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आरोपींना नक्की जेरबंद करू
अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचा शोध लागत नसून त्याविषयी पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांना विचारले असता, मानखुर्द आणि शिवाजीनगर येथे घडलेल्या गुन्ह्य़ांची उकल लवकरच करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 2:43 am

Web Title: shriya bodies found
Next Stories
1 राज्यपालांच्या अभिभाषणात स्मारकांचे स्मरण!
2 खासगी कंपनीच्या फायद्यासाठीच ७० हजार रिक्षा परवान्यांचा घाट
3 शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा पाडवा मेळावा!
Just Now!
X