शीना बोरा हत्याकांडातील माफीचा साक्षीदार श्यामवर राय याने आपल्या १२ पानांच्या लेखी कबुलीजबाबात ही हत्या नेमकी कशी घडली याची सविस्तर माहिती दिली आहे. शीनाची आई आणि या हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिनेच शीनाचा गळा दाबला होता. तिच्या सांगण्यावरून मी आणि तिचा दुसरा पती संजीव खन्ना आम्ही दोघे मिळून तिला मदत करत होतो. मी शीनाचा चेहरा पकडला होता तर संजीव खन्ना याने तिचे अंग पकडले होते, असे श्यामवर राय याने आपल्या कबुली जबाबात म्हटले आहे. २४ एप्रिल २०१२ रोजी मोटारीमध्ये ही घटना घडल्याचे त्याने लिहिले आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी हा लेखी कबुलीजबाब या हत्याकांडातील सर्व आरोपींकडे देण्यात आला. इंद्राणीचे सध्याचे पती पीटर मुखर्जी यांनाही कबुलीजबाबाची प्रत देण्यात आली.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मुंबई पोलिसांनी श्यामवर राय याला अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला होता. त्यावेळी राय याच्याकडे एक गावठी कट्टाही सापडला होता. तो कट्टाही इंद्राणीच्या सांगण्यावरून आपल्याकडे पार्सलच्या माध्यमातून देण्यात आला. तीन महिन्यांचे आगाऊ वेतन देऊन माझ्या नोकरीचा करार संपुष्टात आणण्यात आला होता. इंद्राणीची सहायक काजल शर्मा यांनीच आपल्याला तसे सांगितल्याचे त्याने म्हटले आहे.
इंद्राणी शीनाच्या मांडीवर बसून तिचा गळा दाबत होती. त्यामुळे शीनाने जोरात माझी करंगळी चावली. माझ्या करंगळीतून रक्त येऊ लागले. मग इंद्राणी या शीनाच्या तोंडावरच बसल्या, असे श्यामवर राय याने जबाबात म्हटले आहे.