वाडियातील २० डॉक्टरांचे प्रयत्न; वर्षभराच्या तपासण्यांनंतर शस्त्रक्रिया

परळ येथील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयामध्ये यकृत, पोट आणि मूत्रपिंडासह पाश्र्वभाग (कुले) जुळलेल्या जुळ्यांवर  शस्त्रक्रिया करून करून त्यांना विलग करण्यात आले. या दोन्ही जुळ्यांमध्ये यकृत, आतडे आणि मूत्राशय हे अवयव समान होते. वाडियातील २० डॉक्टरांच्या १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बालकांना वेगळे करण्यात यश आले आहे.

शीतल झाल्टे यांच्या गर्भात शरीराचे अवयव सामाईक असलेली जुळी बाळे असल्याचे निदान नवरोजी वाडिया प्रसूती रुग्णालयात करण्यात आले होते. या जुळ्यांची वैद्यकीय तपासणी व पालकांचे समुपदेशन करण्यात आल्यानंतर झाल्टे यांची प्रसूती पार पाडण्यात आली. गतवर्षी १९ सप्टेंबर रोजी लव्ह आणि प्रिन्स हे सयामी जुळे जन्मले तेव्हापासून या सयामी जुळ्यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. या तपासण्या यशस्वीपणे पार पडल्यानंतर नुकतीच या सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ‘‘एक वर्ष तीन महिन्यांच्या अत्यंत नाजूक वयात लव आणि प्रिन्स यांच्यावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही दोन बालके सध्या बाल अतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात येतील, जेणेकरून ते सुदृढ आयुष्य जगू शकतील. या दोन्ही बाळांच्या आतील अवयवांवर त्वचा बसविणे हे सर्वात मोठे आव्हान होते,’’ असे वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनलवाला यांनी सांगितले.

वाडियातील दुसरी शस्त्रक्रिया

यापूर्वी रिद्धी आणि सिद्धी यांच्यावरही वाडिया रुग्णालयात अशीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर लव व प्रिन्स यांच्यावर झालेली ही दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया आहे. लव आणि प्रिन्स यांचा जन्म वाडिया रुग्णालयातच झाल्याने त्यांच्या शस्त्रक्रियेचे नियोजन करणे तुलनेने सोपे होते. ही दोन्ही बाळे सुदृढ होईपर्यंत त्यांची काळजी घेण्यात येईल व त्यांच्यावर उपचार करण्यात येतील, असे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.