करोना भितीदायक पद्धतीने एकीकडे वाढत आहे तर दुसरीकडे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा ठणठणाट झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन दादरच्या ‘सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास’ व शिवसेनेने पुन्हा एकदा करोनाकाळात रक्तसंकलनाच शिवधनुष्य उचलले आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेच्या शाखांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

करोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी राज्यातील रुग्णालये व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी आरोग्य संचालक डॉ साधना तयाडे यांच्याशी संपर्क साधून जे. जे. महानगर रक्तपेढीच्या माध्यमातून मुंबईतील सोसायटी सोसायटी मध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन केले होते. तेव्हाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून राज्यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन केल्यामुळे हजारो गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळू शकले. आता करोनाच्या लाटेत रक्तदानची समस्या कमालीची गंभीर बनली आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये मिळून जेमतेम २५ हजार रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहेत तर मुंबईत जेमतेम तीन हजार रक्ताच्या पिशव्या शिल्लक असल्याने रुग्णांचे रक्ताअभावी कमालीचे हाल होत आहेत. करोना वेगाने वाढत असल्याने बहुतेक शासकीय व खाजगी रुग्णालयात अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता नियमित शस्त्रक्रिया केल्या जात नाही हे कटू सत्य आहे. बहुतेक ठिकाणी पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल होणार्या अनेक महिलांना सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी रक्त मिळण्यात अडचण येत आहे.

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात रक्ताची भीषण टंचाई लक्षात घेऊन ‘सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास’ विश्वस्त मंडळाच्यावतीने व्यापक रक्तदानाचे आवाहन करण्यात आले आहे. अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी मुंबईतील वेगवेगळ्या भागातील तीनशेहून अधिक रक्तदाते व मंडळांशी थेट संपर्क साधून रक्तदानाची वेळ निश्चित करण्यास सुरुवातही केली. यासाठी जे जे महानगर रक्तपेढीच्या दोन सुसज्ज रक्तसंकलन करणार्या व्हॅन आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिल्या आहेत. आरोग्य संचालक डॉ साधना तायडे या स्वत: रक्त संकलनासाठी पाठपुरावा करत आहेत. याबाबत आदेश बांदेकर यांना विचारले असता ते म्हणाले करोनाची तीव्र लाट लक्षात घेऊन आम्ही थेट रक्तदात्यांच्या दारात जाऊन रक्तसंकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आमच्याकडे तीनशेहून अधिक रक्तदात्यांनी नाव नोंदवले असून हे रक्तदाते ज्या भागात राहातात तेथे आमच्या रक्तसंकलन करणार्या गाड्या जातील व करोना संदर्भातील सर्व नयमांच पालन करून रक्तसंकलन करतील. ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचे असेल त्यांनी श्री सिद्धिविनायक गगणपती मंदिरात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात ०२२-२४२२४४३८ व ०२२-२४२२३२०६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आदेश बांदेकर यांनी केले आहे. आमच्या रक्तसंकलनाच्या गाड्या थेट तुमच्या सोसायटी तसेच विभागात येतील व रक्तसंकलन करतील असेही बांदेकर म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या राज्यभरातील शाखांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास सांगितले असून यापुढे रक्ताची टंचाई भासणार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.