मुंबई : महाराष्ट्रातील कुपोषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या तसेच बालमृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. याची गंभीर दखल घेत दादर-प्रभादेवी येथील ‘श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासा’ने पालघर जिल्ह्य़ातील अंगणवाडय़ांमधील हजारो बालकांना मायक्रोन्यूट्रियन्टयुक्त पौष्टिक लाडू देण्याचा संकल्प सोडला आहे. यासाठी विश्वस्त मंडळाने सिद्धिविनायक न्यासाच्या अर्थसंकल्पात  दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी कुपोषणमुक्तीसाठी प्रायोगिका तत्त्वावर पालघर जिल्ह्य़ातील अंगणवाडय़ांमधील बालकांना मायक्रोन्यूट्रियन्ट व लोहयुक्त पौष्टिक लाडू देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल यांच्याबरोबर गुरुवारी सिद्धिविनायक मंदिरात बैठक घेतली. या बैठकीला आयआयटीचे डॉ. व्यंकटेशन तसेच शीव रुग्णालयाच्या डॉ. अलका जाधव याही उपस्थित होत्या. याबाबत आदेश बांदेकर यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुपोषणमुक्तीसाठी सिद्धिविनायकाच्या माध्यमातून ठोस काही तरी करण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही पालघर जिल्ह्य़ातील अंगणवाडय़ांमधील बालकांना पौष्टिक लाडू देण्याचा निर्णय घेतला. बैठकीत विनीता सिंघल यांनी पालघर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाडू बनविण्यासाठी जागा देण्याचे मान्य केले. तसेच आयआयटीचे तज्ज्ञ आणि पालिकेच्या रुग्णालयातील तज्ज्ञ तसेच ‘न्यूट्रियन्ट बोर्ड ऑफ इंडिया’च्या सहकार्यातून पौष्टिक लाडू कशा प्रकारे तयार करायचे याचा आराखडा येत्या तीन आठवडय़ांत तयार केला जाणार आहे. लाडू बनविणारी उपकरणेही मी पाहिली असून त्याचा वापर केल्यास आरोग्य व स्वच्छतेच्या निकषांचे काटेकोर पालन होऊ शकेल, असेही बांदेकर म्हणाले. पालघर जिल्ह्य़ात २८०७ अंगणवाडय़ा असून यामध्ये १,७८,२१९ बालके आहेत. यातील काही अंगणवाडय़ांमध्ये लवकरच पौष्टिक लाडू-वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार असून महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून त्याची यशस्विता तपासून पाहिल्यानंतर पालघरमधील सर्व अंगणवाडय़ांमध्ये ही योजना राबविण्यात येईल, असे आदेश बांदेकर यांनी सांगितले.