अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त काम थांबवणार; नर्दुल्ला टँक मदान, साने गुरुजी उद्यानात मंडप उभारणी

येत्या १३ जून रोजी असलेल्या अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरामागील नर्दुला टँक मदान आणि साने गुरुजी उद्यानात सुरू असलेले मेट्रो-३ चे काम दोन दिवसांसाठी थांबवले जाणार आहे. या दिवशी लाखोच्या संख्येने भाविक मंदिरात येत असल्याने मंदिराबाहेर लागणाऱ्या रांगेच्या व्यवस्थापनासाठी मंदिर प्रशासनाने उद्यान आणि मदानातील काही भाग ताब्यात घेतला असून त्याठिकाणी मंडप उभारण्यात आला आहे. सध्या प्राथमिक स्तरावर मेट्रोचे काम सुरू असल्याने मंदिर प्रशासनाला परवानगी मिळाली असली तरी पुढे भविष्यात प्रशासनाला नवीन जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.

अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्ताने सिद्धिविनायक  मंदिर प्रशासनाकडून मंदिरामागे असलेल्या नर्दुला टँक मदानात दरवर्षी मंडप उभारण्यात येतो. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून लावल्या जाणाऱ्या रांगेच्या व्यवस्थापनासाठी हा मंडप उभारण्यात येतो. कुलाबा-सिप्झ या मेट्रो-३ च्या सिद्धिाविनायक स्थानकाच्या कामानिमित्ताने नर्दुला टँक मदान आणि साने गुरुजी उद्यान मेट्रो प्रशासनाने ताब्यात घेतले असून याठिकाणी सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून रांगेच्या व्यवस्थापनासाठी नवीन जागा शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र येणाऱ्या लाखो भाविकांचा विचार करता मंदिर प्रशासनाने मदानातील काही जागा उपलब्ध करून देण्याची विनंती मेट्रो प्रशासनाला केली होती. यावर सकारात्मक प्रतिसाद देत मेट्रो प्रशासनाने साने गुरुजी उद्यान आणि नर्दुला टँक मदानाची काही जागा मंदिराला उपलब्ध करून दिल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी दिली. याशिवाय दोन दिवस काम बंद करणार असल्याचे आश्वासनही मेट्रो प्रशासनाने दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले. परवानगी मिळताच मंदिर प्रशासनाने याठिकाणी नऊ हजार भाविकांच्या क्षमतेचे दोन मंडप बांधले आहेत. सध्या त्याठिकाणी मेट्रोचे काम प्राथमिक स्तरावर सुरू असल्याने काम थांबवणे शक्य आहे. मात्र पुढे भविष्यात कामाचा विस्तार वाढणार असल्याने मंदिर प्रशासनाला नवीन जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. यासंबंधी पाटील यांना विचारले असता, येत्या अंगारकी संकष्ट चतुर्थीचा प्रश्न मिटला असला तरी नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त व्यवस्थापनासाठी नवीन जागेचा शोध घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.