हार्बर रेल्वेवरील सिग्नल यंत्रणेला आगीचे प्रकरण
वडाळा स्थानकाजवळील रावळी जंक्शनला गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याला आग लागल्याने सिग्नलची वायर जळाली असे मध्य रेल्वेने जाहीर केले असले तरी आग लागलेले ठिकाण आणि सिग्नल यंत्रणेत सुमारे ३० फुटांचे अंतर असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणेतील बिघाडाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकालगत असणाऱ्या रावळी जंक्शनला बुधवारी सायंकाळी सिग्नलच्या वायरला आग लागल्याने वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. याची गंभीर दखल घेत रेल्वे मंत्रालयाचे सदस्यही मुंबईत दाखल झाले होते. मात्र आग लागलेल्या ठिकाणापासून सिग्नल यंत्रणा ३० फुटांच्या अंतरावर असल्याची माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह होत आहे. या प्रकरणाची चौकशी होणार असताना रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्याच्या या माहितीनंतर रेल्वेच्या कारभाराविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
तसेच प्रवाशांना पुरविण्यात आलेल्या खोटय़ा माहितीची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.