कळवा आणि मुंब्रा या दोन स्थानकांदरम्यान सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन लोकल्सचा खोळंबा होतो आहे. त्यामुळे ऑफिस संपवून घरी जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल्स २० मिनिटे उशिराने धावत आहेत. या बिघाडामुळे मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरची वाहतूक २० मिनिटे उशिराने होते आहे. साधारण मागील ५० मिनिटांपासून प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागतो आहे. कळवा या ठिकाणी ट्रेन १५ मिनिटे थांबल्याचे ट्विट काही प्रवाशांनी केले आहे. मुंबई ट्रेन अपडेट्स या फेसबुक ग्रुपवरही यासंदर्भात काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेवर अशा समस्या होणं काही नवीन नाही. रोज मरे त्याला कोण रडे असेच म्हणण्याची वेळ प्रवाशांवर अनेकदा येते. आजही त्याचाच प्रत्यय या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येतो आहे.