01 June 2020

News Flash

पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

आरे आंदोलकांच्या सुटकेसाठी स्वाक्षरी मोहीम

(संग्रहित छायाचित्र)

आरेमधील आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या २९ आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी विनंती करणारे निवेदन काही नागरिकोंनी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना शनिवारी सादर केले. या मागणीला पाठिंबा मिळविण्यासाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली होती. यात तीन हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. मात्र सध्या निवडणुकीच्या कामकाजामुळे निवेदन घेऊन गेलेल्यांची आयुक्तांशी भेट होऊ शकली नाही.

‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी ४ ऑक्टोबरच्या रात्री आरेमध्ये वृक्षतोडीचे काम सुरू करण्यात आले. याची कुणकुण लागताच त्याला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमी, कार्यकर्ते आरेमध्ये जमा झाले. या वेळी २९ आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

‘ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, ते गुन्हेगार नसून सामान्य नागरिक आहेत. त्यातील काही महिला आणि विद्यार्थी आहेत. आंदोलक त्यांचे पर्यावरण रक्षणाचे घटनात्मक कर्तव्य पार पाडत होते. अशा वेळी त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळणे योग्य नाही,’ असे मत राधिका झवेरी यांनी व्यक्त केले.

आंदोलनकर्त्यांना ४ ऑक्टोबरच्या रात्री जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले. महिला आंदोलकांना पुरुष पोलीस खेचत घेऊन जात होते. त्यांच्यावर लाठीमारही केला गेला. काही आंदोलनकर्त्यांचे मोबाइल हिसकावून घेण्यात आले. त्यातील २९ जणांवर कलम ३५२, ३५३, १४३, १४९ आणि ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. हे सर्व जण जबाबदार नागरिक आणि करदाते असून सराईत गुन्हेगार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे, अशी निवेदनकर्त्यांची मागणी आहे.

‘वृक्ष अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत झाडे तोडली’

वृक्ष अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत झाडे तोडण्यावर निवेदनकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच रात्रीच्या वेळी झाडे तोडणे हे त्यावर आश्रयाला आलेल्या सजीवांसाठी धोकादायक असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. आरे हे जंगल आहे की नाही याबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना वृक्षतोड करणे हे बेकायदेशीर आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या कृतीला विरोध करण्यासाठी आंदोलक तेथे जमले होते. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, असे निवेदनकर्त्यांचे मत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 12:36 am

Web Title: signature campaign for the release of the aarey protesters abn 97
Next Stories
1 वरळी विधानसभा मतदारसंघात ४ कोटींची रक्कम जप्त
2 अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
3 भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही!
Just Now!
X