आठवडाभरात दहिसर, बोरिवली, कांदिवलीत दहा टक्क्यांची घसरण

मुंबई : फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या करोना लाटेत झपाटय़ाने संक्रमित होत असलेल्या उत्तर मुंबईतील भागांत गेल्या आठवडाभरापासून रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मोठय़ा प्रमाणावर करण्यात आलेल्या चाचण्या, बाधित रुग्णांची विलगीकरणात केलेली रवानगी आदी विविध कारणांमुळे रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याचा

दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरांत करोनाबाधितांच्या संख्येत १० टक्क्यांची घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून अचानक रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. करोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली आणि मुंबईत पुन्हा एकदा करोनाचे थैमान सुरू झाले. यामध्ये उत्तर मुंबईमधील कांदिवली, बोरिवली, दहिसर हे भाग आघाडीवर होते.  त्यामुळे पालिकेने या परिसरांतील करोना संसर्ग कमी करण्यासाठी पावले उचलली. या परिसरात सर्वेक्षणावर भर देण्यात आला. सोसायटय़ांमध्ये चाचणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. व्यापक प्रमाणावर चाचण्या करून बाधित रुग्णांचा शोध सुरू करण्यात आला. बाधित रुग्णांना वेळीच विलगीकरणात ठेवण्यात आले. परिणामी, रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

उत्तर मुंबईमध्ये आतापर्यंत ९१ हजार ३८९ जणांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी ७३ हजार २६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर एक हजार ६१७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आजघडीला या भागातील १६ हजार ५०३ रुग्ण उपचार घेत आहेत. उत्तर मुंबईत झोपडपट्टय़ांची संख्या मोठी आहे. मात्र झोपडपट्टय़ांऐवजी इमारतींमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण सापडत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ९२.२८ टक्के रुग्ण इमारतींमधील असल्याचे आढळले आहे. उर्वरित रुग्ण झोपडपट्टय़ा आणि चाळीतील आहेत. बाधित रुग्ण सापडल्यामुळे या भागातील ४२ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली असून १०८ इमारती टाळेबंद करण्यात आल्या आहेत.