अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले असून, पुढील चोवीस तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

हे चक्रीवादळ ३ जूनला महाराष्ट्राला धडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रायगड जिल्ह्य़ातील हरिहरेश्वर आणि दमनच्या दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कोकण, मुंबईपासून उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व आणि दक्षिण पश्चिम भागासह लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा तीव्र होत आहे. पुढील २४ तासांमध्ये म्हणजेच २ जूनपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ते कोकण (हरिहरेश्वर, रायगड), दक्षिण गुजरात आणि मुंबई पार करून उत्तर महाराष्ट्रापर्यंत (नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार) या भागापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळामुळे अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग ताशी ११५ किलोमीटपर्यंत, तर किनारपट्टीवरील वाऱ्यांचा वेग ताशी ८० ते ९० किलोमीटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा जमिनीवर प्रवेश झाल्यानंतर कोकणातील पालघर, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात ४ जूनपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्य़ात अतिवृष्टीचा इशारा आहे. त्याचप्रमाणे ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर या भागांतही पूर्वमोसमी पाऊस सोसाटय़ाच्या वाऱ्यासह हजेरी लावणार आहे.