राजकीय विषयांवर भूमिका घेणारे काही कलाकार नक्कीच इथेही आहेत. त्यांचे प्रमाण भलेही कमी असेल, पण ते आपले मत व्यक्त करतात. ज्यांचा आवाज ऐकला जाईल, असे अनेक कलाकार आहेत, पण आपण बोललो तर आपल्याकडचे बरेच काही गमावून बसू, अशी भीती असलेले राजकीय विषयांवर गप्प बसतात, असे स्पष्ट मत प्रख्यात अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले. मात्र आपल्या निर्भीड भूमिकेच्या बदल्यात काही गमावून बसण्याचे हे भय हळूहळू कमी होईल, असा विश्वास व्यक्त करत आपल्याकडची वैचारिक, सामाजिक परिस्थिती अगदीच निराशाजनक नसल्याचे त्यांनी सूचित केले.

पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीय कलाकार सामाजिक आणि राजकीय वास्तवाविषयी मौन बाळगणे का पसंत करतात?, मेरिल स्ट्रिप या अभिनेत्रीसारखी भूमिका आपल्याकडचे कलाकार का घेत नाहीत, असे विचारता नसिरुद्दीन शाह म्हणाले, भारतातही काही मोजके का असेनात, पण भूमिका घेणारे कलाकार आहेत. जे मौन बाळगतात त्यांना काही गमावण्याची भीती आहे, पण तीही कमी होत जाईल.

नाटकामुळेच आपल्या आयुष्याला अर्थ आला, असे मानणाऱ्या नसिरुद्दीन यांच्या रंगभूमीवरील ४० वर्षांच्या समृद्ध अनुभवविश्वातून आलेले थेट बोल उपस्थितांच्या मनाला भिडले. एका सच्चा कलाकाराचे त्याच्या चाहत्यांच्या मनातील स्थान नेमके काय असते, याची प्रचिती नसीरुद्दीन शाह यांचे ज्या पद्धतीने दणाणून टाकणाऱ्या टाळ्यांच्या गजरात ‘लोकसत्ता’ लोकांकिकाच्या मंचावर स्वागत झाले त्यातून आली. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या सहाव्या पर्वाचा दिमाखदार महाअंतिम सोहळा शनिवारी, २१ डिसेंबरला यशवंत नाटय़मंदिर येथे झाला. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी नसीरुद्दीन शाह यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना प्रतिभावंत कलाकार, जातिवंत नाटय़कर्मी अशी ओळख असलेल्या नसीरुद्दीन यांनी नाटकाची मुलभूत परिभाषा, सैध्दांतिक मांडणी अतिशय सहजसोप्या भाषेतून तरुण रंगकर्मीना समजावून सांगितली.

मनापासून नाटक करण्याची इच्छा असणाऱ्यांना कोणीही अडवू शकत नाही. नाटक जिवंत होण्यासाठी केवळ एक कलाकार आणि एक प्रेक्षक गरजेचा असतो. नाटक हा कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील थेट संवाद आहे, विचारांची देवाणघेवाण आहे, संवेदनांचे आदानप्रदान आहे. नाटककाराला जे सांगायचे आहे तो विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हेच नाटकाचे उद्दिष्ट असते. नाटकाची ही परिभाषा नीट समजून घेत आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटक करत राहिले पाहिजे, असे आवाहन नसीरुद्दीन यांनी नवोदित रंगकर्मीना केले. नाटकासाठी पटकथेची गरज आहे. मला ‘मुघल-ए-आझम’सारखे भव्य नाटक करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये मिळणार आहेत, आता नाटक करूयात या विचारात अडकून नाटक होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. तुमचे नाटक पाहायला दहाच लोक आले आहेत, या विचाराने उदास होण्यापेक्षा दहा लोक तुमचा विचार ऐकण्यासाठी आले आहेत, हे वास्तव महत्वाचे आहे, याची जाणीव दुबेंसारख्या नाटय़कर्मीने करून दिली, हे सांगतानाच दुर्दैवाने दुबेंसारख्या दिग्गज नाटय़कर्मीचे काम खूप जणांना पाहता आले नाही, याबद्दलही नसीरुद्दीन  यांनी खंत व्यक्त केली.

नाटकांमध्ये परदेशातील ब्रॉडवे, ऑपेराच्या धर्तीवर सिनेमॅटिक तंत्र वापरण्यावर नसीरुद्दीन यांनी कडाडून टीका केली. रंगभूमीवर भ्रम निर्माण करता येत नाही, मग तिथे चित्रपट माध्यमाप्रमाणे दृश्यात्मक वातावरण निर्माण करण्यात काय अर्थ आहे?, असा सवालही त्यांनी केला. प्रत्येक माध्यमाची आपली एक संरचना आहे, असे स्पष्ट करतानाच छायाचित्रण आले तेव्हा चित्रकला संपेल, असे बोलले जात होते. मात्र चित्रकारांनी केवळ वास्तववादी शैलीत न अडकता वेगवेगळे प्रयोग करत कला जिवंत ठेवली. चित्रपट आले तेव्हापासून रंगभूमी लयाला जाणार, अशी चर्चा मी ऐकत आलो आहे. उलट, गेल्या पन्नास वर्षांत रंगभूमी जितकी सक्षम नव्हती त्यापेक्षाही भक्कमपणे उभी आहे, याकडे शाह यांनी लक्ष वेधले. नाटक समजून घेण्यासाठी नाटक कसे जन्माला आले असेल?, याची सैध्दांतिक मांडणीही समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगत शाह यांनी नाटय़कलेच्या जन्माचा सिध्दांतही समजावून सांगितला.

कलाकार म्हणून ज्या पद्धतीची भूमिका तो निवडतो, त्यातून त्याचे राजकीय तत्वज्ञान काय असेल?, याचा अंदाज बांधता येतो. पण केवळ आज आपल्या आजूबाजूला अस्थिर वातावरण आहे म्हणून नव्हे तर नेहमीच आपल्या सभोवतालाचे निरीक्षण करत राहिले पाहिजे, भवतालाबद्दल जागरूक असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ही निरीक्षणशक्तीच कलाकाराला सक्षम करते, असे सांगतानाच कलाकाराचे काम कधीच संपत नाही. तो सतत शिकत-शिकत पुढे जात असतो. त्यामुळेच त्याला त्याच्या कामाचा कंटाळा येत नाही, त्याची कला त्याला सतत आनंदच देते, असेही नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले.

सध्या नाटकांवर टीव्ही माध्यमाचा प्रभाव आहे, जो साहजिक आहे. टीव्ही माध्यम गावखेडय़ापर्यंत पोहोचले असल्याने त्याचे परिणाम सर्वावर वेगाने होत आहेत, पण मुळात सध्या हे माध्यम बुरसटलेले विचार जनमानसांपर्यंत पोहोचवत असल्याबद्दलही नसीरुद्दीन यांनी नाराजी व्यक्त केली. चित्रपट माध्यमातून सक्षम कलाकार म्हणून घराघरांत प्रसिद्ध असलेल्या नसीरुद्दीन शाह यांनी कलाकार म्हणून असलेले आपले अस्तित्व, वैचारिक जडणघडण हे नाटकातूनच झाले आहे, ही गोष्ट अधोरेखित केली. नाटक आणि रंगकर्मींबदद्ल असलेले नसीरुद्दीन शाह यांचे प्रेम आणि त्यांच्यातील कलावंताला ‘वुई लव्ह यू’ म्हणून तरुण नाटय़कर्मीनी दिलेली उत्स्फूर्त दाद अशी अनोखी संवाद मैफल लोकसत्ता लोकांकिकाच्या मंचावर रंगली.

नाटक हा कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील थेट संवाद आहे, विचारांची देवाणघेवाण आहे, संवेदनांचे आदानप्रदान आहे. नाटककाराला जे सांगायचे आहे तो विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हेच नाटकाचे उद्दिष्ट असते. नाटकाची ही परिभाषा नीट समजून घेत आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटक करत राहिले पाहिजे.

– नसिरुद्दीन शाह