‘हृदयेश आर्ट्स’चे रौप्यमहोत्सवी वर्ष मोठय़ा दिमाखात साजरे करण्यात येणार असून त्याचे प्रतिबिंब २५ व्या ‘हृदयेश फेस्टिव्हल’मध्ये उमटणार आहे. ९ ते १२ जानेवारी या चार दिवसांत पाल्र्यातील टिळक विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या ‘हृदयेश फेस्टिव्हल’मध्ये यावर्षी पद्मभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना ‘हृदयनाथ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच यंदाचा ‘हृदयेश संगीत सेवाव्रती’ पुरस्कार शारदा संगीत विद्यालयाला देण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता’ व ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची प्रस्तुती असलेल्या या सोहळय़ात दिग्गज कलाकार आपल्या गायन-वादनाची मैफल रंगवणार आहेत.
शिरीष गानू व त्यांच्या जयसत्य चॅरिटेबल ट्रस्टचे मोलाचे सहकार्य या फेस्टिव्हलला लाभणार आहे. दरवर्षी या महोत्सवात शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेल्या कलाकाराला ‘हृदयेश संगीत सेवाव्रती’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. मात्र, यावर्षी कोणत्याही व्यक्तीला हा पुरस्कार न देता पुरस्काराच्या रक्कमेत भर घालून संगीत संवर्धनासाठी झटणाऱ्या ‘शारदा संगीत विद्यालया’ला हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या रौप्यमहोत्सवी ‘हृदयेश फेस्टिव्हल’ला शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री दीपक सावंत, पाल्र्याचे आमदार पराग आळवणी, नगरसेविका ज्योती आळवणी, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
डॉ. प्रभा अत्रेंसारख्या प्रतिभावंताने ‘हृदयेश फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ रोवली होती. यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनला ‘हृदयेश आर्ट्स’तर्फे भरीव देणगी प्रदान करण्यात येणार आहे.
– अविनाश प्रभावळकर, अध्यक्ष,‘हृदयेश’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2015 2:47 am