मुंबईला हादरविणारे ७/११चे साखळी बॉम्बस्फोट
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाडय़ांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून अख्ख्या मुंबईला हादरवून सोडणाऱ्या ११ जुलै २००६च्या बॉम्बस्फोट प्रकरणी ‘सिमी’ संघटनेच्या १२ अतिरेक्यांना विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले, तर एकाची निर्दोष सुटका केली. दोषी आरोपींच्या शिक्षेबाबत सोमवारी उभयपक्षी युक्तिवादानंतर न्यायालय शिक्षेचा निर्णय देण्याची शक्यता आहे. शुक्रवारच्या निर्णयामुळे स्फोटांत मृत्युमुखी पडलेल्यांचे आप्त तसेच जखमींची गेल्या नऊ वर्षांपासूनची न्यायाची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींमध्ये कमाल अन्सारी, महम्मद फैजल शेख, एहतेशाम सिद्दिकी, नावेद हुसैन खान, आसिफ खान, तन्वीर अन्सारी, जमीर शेख, महम्मद साजिद अन्सारी, सोहेल शेख, आलम शेख, मुझम्मिल शेख, महम्मद शफी यांचा समावेश आहे. अब्दुल वाहिद शेख याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
या १२पैकी कमाल अन्सारी, महम्मद फैजल शेख, एहतेशाम सिद्दिकी, नावेद हुसैन खान आणि आसिफ खान या पाच आरोपींना न्यायालयाने भादंविच्या कलम १२० (ब) आणि (पान ६ पाहा)

३०२नुसार साखळी बॉम्बस्फोटाचे कटकारस्थान रचणे, कटाची अंमलबजावणी आणि हत्या या आरोपांत दोषी ठरवले आहे. शिवाय ‘मोक्का’ कायद्याअंतर्गतही त्यांना याच आरोपांमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. या पाच आरोपींच्या फाशीची मागणी करणार असल्याचे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. वाहिदच्या सुटकेविरोधातही उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर आरोपींचा सहभाग नसल्याचे ठोस पुरावे देऊनही निकाल विरोधात गेल्याने त्याला आव्हान देणार असल्याचे आरोपींच्या वकिलांतर्फे सांगण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणात १९२ साक्षीदार तपासले, आरोपींच्या वतीने ५२ साक्षीदार तपासण्यात आले, तर न्यायालयाच्या वतीने एका साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली.
प्रसिद्धीमाध्यमांना बंदी
१९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर मुंबईला हादरविणारा हे बॉम्बस्फोट असल्याने या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र निकालाच्या वृत्तसंकलनावर विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने बंदी घालत पत्रकारांना न्यायालयात येऊ दिले नाही. त्यामुळे निकाल देण्याची प्रक्रिया सुरू असताना न्यायालयाच्या बाहेर माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये चांगलीच जुंपली होती.
वास्तविक खटला सुरू असतानाच माध्यमांच्या प्रतिनिधींवर बंदी घालण्यात आली होती. मात्र नंतर ही अट शिथील करत नाव नोंदणीनंतर प्रतिनिधींना प्रवेश देण्याचे जाहीर झाले होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही प्रतिनिधींनी केली होती. निकालासाठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन सकाळी १० वाजताच न्यायालय गाठले. परंतु तेथे गेल्यानंतर न्यायालयात जाण्यापासून रोखण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर सरकारी आणि आरोपींच्या वकिलांकडून मिळालेल्या माहितीवर माध्यमांना अवलंबून राहावे लागले.

कट ते स्फोट..

’स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)ने स्फोट घडविल्याचे तपासात निष्पन्न.

’आझम चिमा या पाकिस्तानी अतिरेक्याच्या आदेशानंतर तीन पाकिस्तानी अतिरेक्यांच्या सहाय्याने १३ आरोपींनी स्फोटाचा कट रचला.

’पाकिस्तानात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण त्यांना मिळाले होते. त्यानंतर पाकिस्तानी अतिरेक्यांच्या मदतीने गोवंडी येथे बॉम्ब बनविण्यात आले.

 

’११ जुलै २००६ रोजी पश्चिम उपनगरीय गाडीच्या प्रथम वर्गाच्या डब्यात हे बॉम्ब ठेवण्यात आले. माहीम, माटुंगा रोड, खार रोड, वांद्रे, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरिवली, मीरा रोड, भाईंदर या स्थानकांवर सायंकाळी ६.२३ ते ६.३४ या वेळेत स्फोट घडविण्यात आले. या स्फोटात १८८ मुंबईकरांचा बळी गेला, तर ८०० हून अधिक जखमी झाले होते.

’स्फोटाच्या जागी सापडलेला कुकर आणि त्यावरील ‘आयएसआय’ मार्कवरून या स्फोटांमागे पाकिस्तानचा हात असल्याचा मुख्य दावा पोलिसांनी केला होता.