शैलजा तिवले

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची नोंद आणि पाठपुरावा करणे शक्य; चार जिल्ह्यांमध्ये उत्तम प्रतिसाद

हृदयविकार किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांनी होणाऱ्या अकाली मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित उच्च रक्तदाबाच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘सिम्पल’ अ‍ॅपचा वापर राज्यात सर्वत्र करण्यात येणार आहे. भंडारा, वर्धा, सिंधुदुर्ग आणि सातारा अशा चार जिल्ह्य़ांमध्ये डिसेंबर २०१८ पासून हे अ‍ॅप कार्यान्वित आहे.

सततची धावपळ, व्यायाम आणि सकस आहाराचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण नोंद घेण्याइतपत वाढले आहे. रक्तदाबाचे निदान वेळेत केले जात नाही. परिणामी बराच काळ रक्तदाब उच्चस्तरावर असल्याने हृदयविकाराचा किंवा पक्षाघाताचा झटका येऊन होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. यावर मात करण्यासाठी म्हणून इंडिया हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह (आएचसीआय) यांच्या मदतीने ‘सिम्पल’ नावाच्या अ‍ॅपचा वापर राज्यातील चार जिल्ह्य़ांमधील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर (पीएचसी) सुरू केला आहे. योग्य व्यवस्थापन आणि पाठपुरावा केल्यास पीएचसी स्तरावर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना हाताळणे शक्य असल्याचे या अ‍ॅपच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. आता लवकरच राज्यातील सर्व पीएचसीवर हे अ‍ॅप सुरू करण्यात येईल असे आरोग्य सेवा आयुक्तालयाचे सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले.

रुग्णाच्या नोंदी करण्यापासून ते दर तीस दिवसांनी पुढील तपासण्या आणि औषधांसाठी पाठपुरावा या अ‍ॅपद्वारे करणे शक्य आहे. अ‍ॅण्ड्रॉईड मोबाइलमध्ये कार्यान्वित असल्याने आरोग्य केंद्रावरील डॉक्टरांसह परिचारिकाही सहजपणे हाताळू शकतात. ३० दिवसानंतर भेटीस न आलेल्या रुग्णांची वेगळी यादी यावर दाखविली जाते. मोबाइलमधूनच त्या रुग्णांना फोनही करण्याची सुविधा आहे. त्यामुळे रुग्णांचा पाठपुरावा करणे तुलनेने सोपे आहे. अ‍ॅपच्या डॅशबोर्डवर नोंद झालेले, उपचारासाठी न आलेले रुग्ण यासह रक्तदाब नियंत्रित आलेले, न आलेल्या रुग्णांची एकत्रित आकडेवारी निदर्शनास येते. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रावरील कामकाजाचा आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेणे सोपे होते. तसेच धोकादायक रुग्णांचे निदान करून पुढील उपचार करणे शक्य होते. तसेच यावरील औषधांच्या साठय़ाची केंद्रामधील उपलब्धताही यावरून समजते, अशी माहिती या जागतिक आरोग्य संघटनेचे कार्डिओव्हस्क्युलर आरोग्य अधिकारी डॉ. अमोल वानखेडे यांनी दिली.

अ‍ॅपला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आएचसीआयकडून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) घेऊन विकसित करणार आहे.

चार जिल्ह्य़ांमध्ये १ लाख २७ हजार रुग्णांची नोंद

वर्धा, भंडारा, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये वर्षभरात १ लाख २७ हजार ८८२ उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. भंडाऱ्यामध्ये सर्वाधिक उच्च रक्तदाबाच्या रुग्ण नोंदले आहेत, तर साताऱ्यात नोंदणीचे काम तुलनेने अजून संथगतीने सुरू आहे. साताऱ्यात नोंद झालेल्या रुग्णांपैकी जवळपास ५० टक्के रुग्ण मागील तीन महिन्यांपासून नियमितपणे उपचार घेत नसल्याचे अ‍ॅपमधून निर्दशनास येते.