17 September 2019

News Flash

खाऊखुशाल : ‘सिंधु खाद्यसंस्कृती’

खार पश्चिमेला असलेलं ‘नेवनदराम गोलूमल अशोक सिंधु प्युअर घी स्वीट्स’

नेवनदराम गोलूमल अशोक सिंधु प्युअर घी स्वीट्स

‘फ्युजन’च्या जमान्यात पुन्हा एकदा सर्व जण पारंपरिक गोष्टींकडे वळू लागले आहेत. हे खाण्यालासुद्धा लागू होतं. जुन्या पदार्थाना वेगळ्या रूपात सादर करण्याचा खटाटोप अनेक जण करीत आहेत. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी कॅफे, बार, लाउंज असं नामकरण करून चवीचे पदार्थ भरमसाट पैसे आकारून दातालाही लागणार नाही इतकं कमी प्रमाण देणारी ही ठिकाणं मुंबई शहरात आता नाक्यानाक्यावर दिसू लागली आहेत. मार्केटिंग म्हणजेच सर्वकाही असलेल्या जमान्यात हा पायंडा न जमलेले मागे पडत गेले पण तरीही काही चव आणि वेगळेपणामुळे जिद्दीने टिकून आहेत हेही खरं. खार पश्चिमेला असलेलं ‘नेवनदराम गोलूमल अशोक सिंधु प्युअर घी स्वीट्स’ हे त्यापैकीच एक.

सिंधी मिठाई आणि इतर पदार्थाच्या या छोटेखानी दुकानात गेल्यावर खरंतर इथे वेगळं काय मिळणार असा प्रश्न सामान्यांना जरूर पडेल. पण दुकानाचे मालक अशोक लुल्ला यांच्याशी गप्पा मारताना कळलं की सिंधु स्वीटचा प्रवास १९०२ पासून पाकिस्तानातील लाहोरपासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या सीतापूर येथून सुरू होऊन फाळणीनंतर इंदूर आणि आता मुंबई असा झालेला आहे. पणजोबा गोलूमल, आजोबा नेवनदराम, वडील द्वारकादास आणि आता अशोकजी अशा चार पिढय़ा मिठाईच्या व्यवसायात आहेत. खार रोड येथील सिंधु स्वीटची स्थापना १९७२ सालची.

दाल पक्वान, सिंधी कढी, छोले समोसा, छोले पॅटिस, छोले भटुरा, लस्सी, आलू तुक, सिंधी भजी हे पदार्थ सिंधुची खासियत आहेत. यापैकी सिंधी कढी, आलू तुक आणि छोले भटुरा हे पदार्थ केवळ रविवारीच मिळतात. त्यामुळे तुम्हाला खवय्येगिरीसाठी रविवारचा मुहूर्तच साधावा लागेल. इथल्या पदार्थाची चव ही ४०-५० च्या दशकातली आहे. समोसाचीच गोष्ट घेतलात तर त्याच्यासोबत छोले असणं ही तेव्हापासून चालत आलेली परंपरा असल्याचं अशोकजी सांगतात. दाल पक्वान हाही अतिशय साधा पदार्थ. तेलात तळलेलं पक्वान  आणि चण्याच्या डाळीपासून जिरं, मिरचीचा तडका दिलेली डाळ. तरीही त्याची चव लाजवाब. इथल्या कुठल्याच पदार्थामध्ये कांदा-लसूण टाकलं जात नाही. चटणीही पालक, पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची या पदार्थापासून तयार केलेली असते. त्याची चव आणि सुवास दोन्ही वेगळा असतो. दाल पक्वानच्या डाळीवरही ती चमचाभर टाकून देतात. रविवारी मिळणारी सिंधी कढी तर बेस्ट. अनेक जण ती पार्सल घेऊन जातात आणि घरी भाताबरोबर वा चपातीसोबत खातात.

रविवारी काऊंटरवर कढीच्या अर्धा किलोच्या पिशव्या बांधून ठेवलेल्या तुम्हाला दिसतील. बेसन आणि टोमॅटोची ‘प्युरी’ हे कढीतील दोन प्रमुख घटक आहेत.

मुंबईतल्या प्रसिद्ध लस्सीमध्ये ‘सिंधु’च्या लस्सीची गणना होते. त्यामुळे ती आवर्जून प्या. मिठाईचे अनेक प्रकार इथे आहेत, पण शेव बर्फी, कराची स्पेशल हलवा, मुगाच्या डाळीचा शिरा आणि उडदाच्या डाळीच्या सुकामेव्याने लगडलेल्या लाडूला तोड नाही. मुंबईतील स्वीट शॉपमध्येही ताजा मुगाच्या डाळीचा शिरा क्वचितच मिळतो. पण सिंधुमध्ये तो तुम्हाला सहज मिळेल. साखर आणि मीठ योग्य प्रमाणात घालून पाडलेली पिवळी शेव दुधात भिजवत ठेवली जाते आणि ‘सिंधु’मध्येच तयार करण्यात आलेल्या माव्याचा वापर करून ‘शेव बर्फी’ तयार केली जाते. ही बर्फी खायला तर अजिबात विसरू नका. मिठाईमध्ये गोडाचं प्रमाण किती असावं याचा उत्तम नमुना म्हणजे ‘शेव बर्फी’.

खार पश्चिम हा लोकवस्तीचा भाग असल्यामुळे अनेक लोकं इथले पदार्थ सकाळच्या न्याहरीला, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाला घरी घेऊन जातात. त्यामुळे हातचलाखी अजिबात करता येत नाही. म्हणूनच ‘सिंधु’ची घरगुती चवीचे पदार्थ ही ओळख आजही कायम आहे.

नेवनदराम गोलूमल

अशोक सिंधु प्युअर घी स्वीट्स

’ कुठे – शॉप क्रमांक ३, सद्गुरू शॉपिंग सेंटर, ३रा रस्ता, खार रेल्वे स्थानक समांतर रस्ता, खार रोड (पश्चिम), मुंबई – ५२

’ कधी – सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत.

प्रशांत ननावरे nanawareprashant@gmail.com

First Published on November 4, 2017 5:24 am

Web Title: sindhu pure ghee sweets in khar