बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीतने एका महिलेला फोनवरून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात मुंबईतील आंबोली पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप करणारी महिला ही त्याच्याच इमारतीत राहणारी आहे.

सोसायटीत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामावरून अभिजीत आणि तक्रारदार महिलेत बाचाबाची झाली. त्यावेळी फोनवर बोलताना अभिजीतने आपल्याला शिवीगाळ केली, असा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

‘ती महिला मला आणि इतर काही जणांना पैसे उकळण्याची धमकी देत होती. मी माझी व्यावसायिक जागा भाडेतत्वावर दिली आहे. आमचे भाडेकरू तिथं ड्रिलिंगचं काम करत होते. या कामाला त्या महिलेने आक्षेप घेतला. म्हणून जागेचा मालक असल्यामुळे मी या प्रकरणात मध्यस्थी केली,’ असं स्पष्टीकरण अभिजीतकडून देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे संबंधित महिलेने स्वत:च दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा अभिजीतने केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाचा : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सलमानच्या मेहुण्याकडून दंड वसूल

याआधीही अभिजीत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आला होता. मुंबईतील लोखंडवाला भागातील दुर्गा पूजा मंडपात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी २०१५ मध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २०१६ मध्ये ट्विटरवरून महिला पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रिती मेनन यांनी अभिजीतविरुद्ध तक्रार दाखल केली होती.