20 November 2019

News Flash

शहरबात : एकपडदा चित्रपटगृहे इतिहासजमा..!

मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली एकपडदा चित्रपटगृहे एकापाठोपाठ एक बंद पडत आहेत

रेश्मा राईकवार reshma.raikwar@expressindia.com

एकीकडे मल्टिप्लेक्सचे तिकिटांचे दर, खाद्यपदार्थाचे दर परवडत नाहीत, अशी ओरड होत असली तरी आजघडीला चित्रपट बघायचा असेल तर सहकुटुंब पावले एकपडदा चित्रपटगृहांकडे नव्हे तर मल्टिप्लेक्सकडेच वळतात. एखादाच असा चित्रपट असतो जो पाहण्यासाठी एकपडदा चित्रपटगृहांना तुडुंब गर्दी होते. वर्षभरातून मोजक्याच चित्रपटांना होणारी ही गर्दी वर्षभर चित्रपटगृह चालवण्याचे आर्थिक बळ देऊ शकत नाही, असे या एकपडदा चित्रपटगृह मालकांचे म्हणणे आहे.

मुंबई मायानगरी.. चित्रपटांची मोहमयी दुनिया जिथे आहे अशा मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली एकपडदा चित्रपटगृहे एकापाठोपाठ एक बंद पडत आहेत. भव्य पडद्यावरचे चित्रपट आणि सुपरस्टार्सचा सिल्व्हर ज्युबिली, गोल्डन ज्युबिली असा वैभवशाली इतिहास पाहिलेली आणि त्या अर्थाने सिनेमाचा ऐतिहासिक वारसा मिरवणारी ही एकपडदा चित्रपटगृहे बंद होण्याचा वेग गेल्या वर्षीपासून अधिकच वाढला आहे. २०१८ हे वर्ष सरता सरताच दक्षिण मुंबईतील इरॉस आणि रिगल अशी दोन चित्रपटगृहे बंद झाली. या वर्षीही सहा महिन्यांच्या आतच चंदन चित्रपटगृह आणि आता चित्रा चित्रपटगृहाचे दरवाजेही बंद झाले आहेत. अर्थात, चंदन चित्रटगृह नव्या ढंगात उभे राहणार असे म्हटले जात असले तरी नव्याने उभे राहिल्यावरही व्यवसाय मिळेल, याची खात्री नसल्याने एकपडदा चित्रपटगृहे इतिहासजमा होणार, अशीच शक्यता जाणकारांकडून वर्तवली जाते आहे.

मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये उच्चभ्रू मध्यमवर्गीयांची संख्या वाढते आहे. इथला प्रेक्षक सहकुटुंब चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा त्याला तिथे खाण्यासाठी चांगले हॉटेल, खेळण्याची जागा आणि अद्ययावत तंत्रज्ञान किंवा सोयीसुविधांनी युक्त असे चित्रपटगृह हवे असते. त्यांच्या अपेक्षांचा विचार करता आज मुंबईत अनेक एकपडदा चित्रपटगृहे जुन्या इमारती, जुन्या खराब झालेल्या स्क्रीन्स, जुन्याच पद्धतीच्या अर्ध्या अशा स्वरूपात उभी आहेत. त्यांच्याकडे हा प्रेक्षकवर्ग कसा वळणार, असा सवाल उपस्थित केला जातो. मात्र प्रेक्षक नाहीत म्हणून उत्पन्न नाही आणि त्यामुळे चित्रपटगृह अत्याधुनिक करण्याचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे आहे त्या स्थितीत चित्रपटगृहे चालवणाऱ्यांना पुन्हा प्रेक्षक मिळतच नाही. एकपडदा चित्रपटगृहांच्या समस्या या अशा एकात एक अडकलेल्या आहेत. देशभरातील ५० टक्के एकपडदा चित्रपटगृहे बंद पडली आहेत. ज्या ‘इम्पिरिअल’ चित्रपटगृहात अमिताभ बच्चन यांचा ‘जंजीर’ चित्रपट ५० आठवडे चालला, अमिताभ बच्चन यांचे जवळपास सगळेच चित्रपट तिथे सुपरहिट झाले आहेत, तिथे आज सी ग्रेड चित्रपट दाखवले जातात.

एकपडदा चित्रपटगृहांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अनेक जुन्या चित्रपटगृहांनी आधुनिकीकरण करून व्यवसाय पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातही त्यांना अपयश आले. ‘अप्सरा’सारख्या चित्रपटगृहाचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. त्यासाठी सरकारकडून चित्रपटगृहांना काही प्रमाणात मदत मिळायला हवी आहे, मात्र ती मिळत नसल्याने आर्थिक कोंडी फोडणे अवघड होत चालले असल्याचे ‘सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे म्हणणे आहे. एकपडदा चित्रपटगृहांना शंभर वर्षांची परंपरा आहे. दूरदर्शनचा वाढता प्रभाव आणि पायरसी यामुळे खऱ्या अर्थाने एकपडदा चित्रपटगृहांना उतरती कळा लागली होती. शुक्रवारी मोबाइलवर तुम्हाल नवीन चित्रपट पाहता यायला लागला, त्यामुळे चित्रपटगृहात कोण जाणार? शिवाय, सध्या इतक्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांतील ५०० ते ७०० चित्रपट लोकांना घरबसल्या पाहायला मिळतात म्हटल्यावर चित्रपटगृहापर्यंत त्यांना आणणे अवघड झाले आहे. नवीन चित्रपटही दोन ते तीन महिन्यांत वाहिन्यांवर येत असल्याने पूर्वी रिपिट रन प्रकार होता तोही पूर्ण बंद झाला. यातून मार्ग काढण्यासाठी सुरुवातीला मल्टिप्लेक्स जेव्हा आले तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी करसवलत देण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांकडून कर वसूल करून त्याचा उपयोग मल्टिप्लेक्सला व्यवस्थापनासाठी करता आला. त्या वेळी मल्टिप्लेक्सना पार्किंग, कॅन्टीन, जाहिराती यातूनही उत्पन्न मिळाले. एकपडदा चित्रपटगृहांनाही तशी सवलत दिली गेली तर त्यांना व्यवसाय सावरण्याचा पर्याय मिळू शकेल, मात्र तसे होत नसल्याचे चित्रपटगृह मालकांचे म्हणणे आहे. एकपडदा चित्रपटगृहांना नव्याने आलेल्या कॉर्पोरेट निर्माते आणि वितरकांची समीकरणेही परवडत नसल्याचे चित्र आहे.

जुनी एकपडदा चित्रपटगृहे ही जवळपास ६०० ते १००० आसनक्षमता असलेली चित्रपटगृहे आहेत. दर आठवडय़ाला शुक्रवार, शनिवार, रविवार हे तीन दिवस वगळता प्रेक्षक नसतो. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच १० टक्के प्रेक्षक असतो. हजार आसनांपैकी शंभरच प्रेक्षक आले तरी चित्रपट लावण्यासाठी जो खर्च येतो तो तेवढाच राहतो. म्हणजे चित्रपटगृह चालवण्याचा रोजचा खर्च लक्षात घेता मालकांच्या हातात काहीच येत नसल्याने हा उद्योग अधिकाधिक मोडकळीला आला आहे. बदललेली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थिती आणि तंत्रज्ञानामुळे वेगाने वाढत गेलेले डिजिटल माध्यम या सगळ्याचा एकत्रित परिणाम एकपडदा चित्रपटगृहांच्या व्यवसायावर झाला आहे. मुंबईतील खरोखरच ऐतिहासिक म्हणावीत अशी नाझ, स्ट्रॅण्ड, मिनव्‍‌र्हा, अ‍ॅलेक्झांड्रा, स्वस्तिक अशी अनेक एकपडदा चित्रपटगृहे बंद पडली आहेत. देशभरात दरवर्षी २०० चित्रपटगृहे तर महाराष्ट्रात २० चित्रपटगृहे बंद पडत आहेत. सध्या महाराष्ट्रातील १२०० एकपडदा चित्रपटगृहांची संख्या ४५० वर आली आहे. आणि चित्रपटगृहे बंद पडण्याचा हा वेग वाढतोच आहे. अगदी मोजकीच चित्रपटगृहे नव्याने उभी राहिली आहेत. त्यात जयहिंद, सिटीलाइट, प्लाझा अशा चित्रपटगृहांचा उल्लेख करावा लागेल, मात्र या चित्रपटगृहांनाही समाधानकारक व्यवसाय मिळतो आहे का, यावर ठाम उत्तर नाही. त्यामुळे चित्रपटगृहे बंद केल्यानंतर तिथे पुन्हा

अत्याधुनिक चित्रपटगृह उभारण्याऐवजी शॉपिंग मॉल, निवासी इमारतीसारख्या आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या पर्यायांचा मोठय़ा प्रमाणावर विचार होताना दिसतो आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर एकपडदा चित्रपटगृहे ही येत्या काही वर्षांत इतिहासजमाच होतील, अशी भीती व्यक्त होते आहे.

First Published on May 21, 2019 4:02 am

Web Title: single screen theatres in mumbai single screen theatres shut down
Just Now!
X