मुंबई उपनगरीय रेल्वेची वहन क्षमता वाढण्यास मदत

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गाची वहन क्षमता येत्या काळात ३० टक्क्यांनी वाढविता यावी यासाठी रेल्वेतर्फे बसविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक डिजिटलाइज्ड ‘कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टिम’ (सीबीटीसी) सिग्नल यंत्रणेकरिता सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’ने (एमआरव्हीसी) घेतला आहे. याकरिता १६ सप्टेंबपर्यंत निविदा भरता येईल. या यंत्रणेमुळे एका तासांत २४ लोकल फेऱ्या रेल्वेला चालविता येतील, अशी माहिती एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग आणि हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार, डहाणू मार्गावर जुन्याच पद्धतीची यंत्रणा आहे. ट्रेन मॅनेजमेन्ट सिस्टिममार्फत सिग्नल यंत्रणा व लोकल फेऱ्या हाताळल्या जातात. त्याजागी सीबीटीसीसारखी डिजिटलाइज्ड सिग्नल यंत्रणा राबविली जाणार आहे. ही यंत्रणा सीएसएमटी ते कल्याण, सीएसएमटी ते पनवेल आणि चर्चगेट ते विरार मार्गावर राबवण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणेत बदल केल्यामुळे लोकलच्या फेऱ्यांत वाढ होऊन प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही वाढेल, असा दावा एमआरव्हीसी अधिकारी करतात.

नवीन सिग्नल यंत्रणा नेमकी कशी राबवावी, लोकल फेऱ्या कशाप्रकारे वाढतील, त्याचा प्रवाशांना कितपत फायदा होईल, तांत्रिक अडचणी उद्भवू शकतील का, प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतो का, अशा मुद्दय़ांवर काम करण्यासाठी एमआरव्हीसीने सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबीटीसी म्हणजे काय?

या डिजिटल यंत्रणेमुळे मोटरमनला बसल्या जागी वेगासंबंधात नियंत्रण कक्षाकडून सिग्नलद्वारे झटपट सूचना मिळतील. तसेच पुढे धावत असणाऱ्या लोकल गाडय़ांसदर्भातही सिग्नल मिळेल. यामुळे लोकल वेळेत धावतील. तसेच लोकल फेऱ्यांची संख्याही वाढण्यास मदत होईल.

प्रवाशांसाठी फायदेशीर कसे?

  • सध्या दोन लोकलमध्ये तीन ते चार मिनिटांचा वेळ असतो. हीच वेळ अडीच मिनिटांवर येईल.
  • परिणामी एका कॉरिडॉरमध्ये (उदा-सीएसएमटी ते कल्याण) एका तासात २४ लोकल फेऱ्या होतील. सध्या एका तासात १८ लोकल फेऱ्या होतात.
  • ३० टक्क्यांनी फेऱ्या वाढतील. तेवढीच प्रवासी वाहून नेण्याचीही क्षमता वाढणार आहे.